Thursday, May 2, 2024
Homeनगरके. के. रेंजमध्ये शेतकर्‍यांची गुंठाभर जमीन जाणार नाही

के. के. रेंजमध्ये शेतकर्‍यांची गुंठाभर जमीन जाणार नाही

राहुरी/ उंबरे |तालुका प्रतिनिधी/वार्ताहर| Rahuri

के. के. रेंजसाठी शेतकर्‍यांची एक गुंठा जमीन जाऊ देणार नाही. संरक्षण मंत्र्यांच्या मदतीने हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार आहे, अशी ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. कोणत्याही विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. राहुरी तालुक्यातील आगामी निवडणुका मित्र पक्षांना सोबत घेऊन लढविल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

राहुरी येथे नगरपरिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहर भुयारी गटारयोजना (किंमत 134 कोटी 98 लक्ष रुपयांपैकी पहिला टप्प्याच्या 92 कोटी 98 लक्ष रुपये) कामाचे भुमिपूजन ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली खा. डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती अ‍ॅड. सुभाष पाटील, कारखान्याचे माजी चेअरमन नामदेवराव ढोकणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आदींच्या उपस्थितीत पार पडला.

ना. विखे पाटील म्हणाले, चांद्रयान यशस्वी करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिपत्याखाली भारत देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. संवेदनशील पंतप्रधान आपल्या देशाला मोदी यांच्या रूपाने लाभले आहेत. भ्रष्टाचारमुक्त शासन देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे. वाळू तस्करी कमी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आम्ही जे धोरण अवलंबले, त्या धोरणामुळे आज मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कमी झालेली आहे. सरकारबरोबरच सामान्य माणसांपर्यंत योजना पोहोचाव्यात यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे. आम्ही विकासाच्या कामांमध्ये कधी मागे राहणार नाही. शेतकर्‍यांसाठी आत्तापर्यंत कधीही जाहीर झाला नाही एवढा 2410 रुपयांचा भाव शासनाने कांद्याला जाहीर केला आहे. सहकारी कारखानदारी जगावी, यासाठी केंद्र शासनाने सहकारी साखर कारखान्याला मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. इन्कमटॅक्समध्ये सूट देऊन त्यांनी या कारखान्यांना जीवनदान देण्याचा प्रयत्न केला असून जो कारखाना उसाला अधिक भाव देईल त्याला इन्कमटॅक्स देखील माफ होणार आहे.

इथेनॉलचे धोरण अवलंबल्यामुळे सहकारी साखर कारखाने सुस्थितीत येण्यासाठी मदत होणार आहे. सध्या पाऊस नसल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. मात्र गेल्या वर्षी पाच हजार शेतकर्‍यांनी या तालुक्यांमध्ये पिक विमा उतरवले होते. त्याची संख्या केवळ एक रुपयांमध्ये पिक विमा असल्याने आज 54 हजारावर गेली आहे. यातून शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. लवकरच ज्यांची पिके गेली आहे. त्या ठिकाणी पंचनामे सुरू होणार आहेत. शेतकर्‍यांना दिलासा म्हणून येत्या 1 सप्टेंबर पासून मुळा उजव्या कालव्याला देखील पाणी सोडण्यात येणार असून या संकटात शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे काम सरकार करीत आहे. के. के. रेंजबाबत बोलताना ना. विखे पाटील यांनी सांगितले. लवकरच देशाचे संरक्षणमंत्री लोणी येथे येणार असून त्यांच्या माध्यमातून केके रेंजचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाईल. कोणत्याही शेतकर्‍यांची एक गुंठा देखील जमीन के. के. रेंजसाठी जाऊ दिली जाणार नाही. याबाबत शेतकर्‍यांनी निश्चिंत राहावे.

खा. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, लोकसंख्या वाढीप्रमाणे राहुरी शहराचा विकास करणे ही आज काळाची गरज आहे गेल्या पन्नास वर्षांत राहुरीचा विकास जसा झाला नाही, तो आम्ही करून दाखवू. त्यासाठी आम्ही योजना तयार केल्या आहेत. येत्या एक महिन्यांमध्ये शासनाची 11 हेक्टर जमीन राहुरीकरांसाठी देऊन या जमिनीवर प्रशासकीय इमारत, पोलीस स्टेशन, शासकीय दवाखाना, त्याचबरोबर पाच एकर जागा ज्यांना घर बांधण्यासाठी जमीन नाही अशा प्रत्येक कुटुंबाला अर्धा गुंठा जमीन देण्यासाठी आरक्षित केली जाणार आहे. एकाच छताखाली सर्व शासकीय कार्यालय आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.

तो आम्ही यशस्वी करणार आहोत. त्यातून राहुरीचा विकास साधणार आहोत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी सध्या शासकीय ऑफिस आहेत. त्या ठिकाणी नंतर कॉम्प्लेक्स बांधून शहरातील व्यापारी बांधवांना देखील व्यापारासाठी मोठी संधी निर्माण करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून व्यापार वाढणार आहे. मागील काही वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे. त्यांनी राहुरीचा विकास करण्याचा प्रयत्न केला नाही हे देखील दुर्दैव आहे. एकाच कुटुंबाकडे सत्ता असताना देखील त्यांनी शहराचा विकास केला नाही. राहुरीकरांनी त्यांना अनेक वेळा सत्ता दिली. मात्र आता विकास काय असतो हे आम्ही राहुरीच्या जनतेला दाखवून देऊ. के. के. रेंजबाबत शेतकर्‍यांनी निश्चिंत राहावे. मी खासदार म्हणून या जमिनी पुन्हा शेतकर्‍यांना मिळाव्यात यासाठी आग्रही आहे. एकाही शेतकर्‍याची जमीन जाऊ देणार नाही. त्यांच्या प्रपंचासाठी खासदारकी पणाला लावू. आम्ही तत्त्वाशी तडजोड करणारे नाहीत. शेतकर्‍यांसाठी लढू. केंद्रीय संरक्षण मंत्र्यांकडून हे काम करून घेऊ, असे यावेळी खा. विखे यांनी सांगितले.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले, राज्यात व देशात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे आपल्याला सर्व विकास कामे करून घेता येतात. लोकांनी भावनेला बळी पडून विरोधी आमदार निवडून दिला. त्यांना मंत्री केले गेले. मात्र नागरिकांच्या कोणत्याही अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या नाहीत. निवडणुकीत दिलेेली आश्वासने त्यांनी पूर्ण केलेले नाहीत. केंद्र शासनाच्या धोरणामुळे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे सर्वांना पिण्याचे पाणी मिळावे, याबाबतच्या योजना जाहीर केल्या. मात्र यांचा कोणताही सहभाग नसल्याने आम्ही केलेल्या भूमिपूजनानंतर त्यांनी श्रेय घेण्यासाठी भूमिपूजन सुरू केली. मात्र जनता वेडी नाही आपले नाकर्तेपण झाकण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. योजना जर केंद्राची असेल तर त्यात यांचा संबंध काय? असा प्रश्न देखील यावेळी कर्डिले यांनी उपस्थित केला. ग्रामीण रुग्णालयासाठी मी स्वतः आमदार असताना निधी आणला. मात्र मला श्रेय मिळू नये म्हणून नगरपालिका यांच्या ताब्यात असल्याने त्यांनी साधा ना-हरकत दाखला दिला नाही.

वांबोरी चारीच्या दुसर्‍या टप्प्याचे श्रेय देखील घेण्याचा प्रयत्न यांचा सुरू आहे. मात्र आता शासन आमचे आहे हे यांनी लक्षात घ्यावे. जमिनी बळकवणार्‍या या लोकांना विकासापेक्षा मलिदा महत्त्वाचा आहे. आम्ही सत्तेवर असो अथवा नसो तरीदेखील विकासासाठी झटून अन्यायाच्या मागे उभे राहणारे आम्ही आहोत. के. के. रेंजचा प्रश्न सोडवा व उजव्या कालव्याला पाणी सोडवा, अशी मागणी त्यांनी यावेळी करत यापुढील सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरच लढवाव्यात, असे सांगत उद्याचे खासदार डॉ. सुजय विखे हेच राहणार असल्याचे देखील स्पष्ट केले.

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील म्हणाले, विखेंनी काही केले की, त्याची पुनरावृत्ती करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधक करीत आहेत. मंजूर करून आणलेल्या कामाचे भूमिपूजन पार पडले की तेथे जाऊन पुन्हा भूमिपूजन करायचे हा त्यांचा अजेंडा आहे. आता मात्र त्यांच्या पक्षाचे एका खोलीत बसावे एवढेच आमदार राहिले आहेत. आत्ता सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे. आता कोणाला भूमिपूजनाला बोलवावे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. राहुरीतून ना. विखे यांची मिरवणूक निघते हा नेहमी शुभ संकेत राहिलेला आहे. ना. विखे हे संधीचे सोने करणारे असून तालुक्याच्या विकासामध्ये त्यांच्यामुळे मोठी भर पडणार आहे. ना. विखेपाटील यांनी राहुरी शहरातील भुयारी गटार योजनेला सहकार्य केल्याबद्दल अ‍ॅड. पाटील यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

प्रास्ताविकात रावसाहेब चाचा तनपुरे म्हणाले, वेळोवेळी पाठपुरावा करून या योजनेसाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मदतीने 134 कोटी 98 लाख रुपये निधी मंजूर करून आणलेला आहे. यासाठी अनेक दिवस कष्ट घेऊन विविध कागदपत्रांची पूर्तता केली. त्याचबरोबर अनेक वेळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे ना. विखेपाटील यांच्या माध्यमातून जाऊन हा निधी मंजूर करून घेतलेला आहे. याचे श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न करू नये. भूमिगत गटारी झाल्यानंतर शहरांच्या रस्त्यांची दुरावस्था होणार आहे. हे रस्ते होण्यासाठी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर मुळा नदीच्या कडेला राहुरी शहरालगत संरक्षण भिंत बांधण्यात यावी, ग्रामीण रुग्णालयाला निधी मंजूर करावा प्रशासकीय इमारत बांधून मिळावी, अशा मागण्या केल्या. तसेच न.पा. चे माजी विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे यांनी शहरातील बसस्थानकाच्या झालेल्या दुरावस्थेकडे ना. विखेपाटील यांचे लक्ष वेधले.

यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुरी येथील कचरा डेपोसाठी असणार्‍या जागेचा उतारा नगरपालिकेच्या नावावर करून सुपूर्त केला.

यावेळी आर. आर. तनपुरे, शामराव निमसे, सुरसिंगराव पवार, उत्तमराव म्हसे, दत्तात्रय ढुस, कारभारी डौले, अमोल भनगडे सुभाष गायकवाड, चांगदेव भोंगळ, सुरेश बानकर, प्रफुल्ल शेळके अतिक बागवान, गणेश खैरे, अण्णा शेटे, नयन शिंगी, सोन्याबापू जगधने, संदीप भोंगळ, नारायण धोंगडे, शिवाजी गाडे, सुधीर धुमाळ, के.मा पाटील, साईनाथ कोळसे, प्रकाश पारख, डॉ राजेंद्र उंडे, गोरक्षनाथ तारडे, उत्तमराव खुळे, दत्तात्रय खुळे कैलास माळी, दिपक मेहेत्रे, राजेंद्र म्हसे, रविंद्र म्हसे, उमेश शेळके, बाळासाहेब येवले, साहेबराव तोडमल, सुभाष वराळे, प्रदीप भुजाडी, ज्ञानेश्वर पोपळघट, गंगाधर सांगळे, देवेंद्र लांबे, अशोक वामन, आबासाहेब येवले, सुरेश भुजाडी, शिवाजीराव डौले, मधुकर पोपळघट, रंगनाथ तनपुरे, सचिन म्हसे, अजित डावखर, बबन कोळसे, उत्तमराव आढाव, अरूण साळवे, भाऊसाहेब काकडे, अक्षय तनपुरे, सुजय काळे, अ‍ॅड. भाऊसाहेब पवार, बाबासाहेब शिंदे, कांतीराम वराळे, गोपाळ अग्रवाल, चांगदेव भोंगळ, राजेंद्र वराळे, प्रभाकर हरिश्चंद्रे, ज्ञानेश्वर विखे, मनोज गव्हाणे, साईनाथ कदम तसेच प्रातांधिकारी किरण सावंत, तहसिलदार चंद्रजित राजपूत, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे आदींसह भाजपाचे व विकास मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले. तर आभार डॉ.धनंजय मेहत्रे यांनी मांनले.

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी शहरातील रस्त्यासाठी 100 कोटी रुपयांची मागणी केली. त्यावेळी ना. विखे पाटील यांनी तुम्ही भाजपामध्ये या, भाजपात प्रवेश करण्याची तारीख ठरवा त्यादिवशी मी स्वत: 100 कोटी रुपयांचा निधीचा चेक घेऊन येतो. असे सांगून रावसाहेब चाचा तनपुरे यांना भाजपामध्ये प्रवेश करण्याचे आवाहन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या