मुंबई | Mumbai
राज्यात महायुतीमध्ये काही जागांच्या वाटपावरुन अद्याप गोंधळ पहायला मिळत होता. त्यातील कल्याण आणि ठाण्याच्या जागेचा तिढा निर्माण झाला होता. पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच शिवसेना शिंदे गटाने कल्याण आणि ठाण्याचे उमेदवार जाहीर केल्याने महायुतीच्या ठाणे आणि कल्याणच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. नरेश म्हस्के यांचे ठाण्यातून तर कल्याणमधून डॉ. श्रीकांत शिंदे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे.
ठाणे लोकसभेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी काही प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अंतीम निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे. ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच कल्याण मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे.
ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागांवर भाजपाकडूनही दावा करण्यात येत होता. ठाणे आणि कल्याण या दोन्ही क्षेत्रात भाजपाची ताकद सुद्धा वाढली आहे. त्यामुळे या दोन्ही जागा भाजपाला मिळतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता. पण ही शक्यता फोल ठरली आहे. एकनाथ शिंदे शिवसेना गटाकडून प्रताप सरनाईक यांचं नाव सुद्धा चर्चेत होते. ते ओवळा-माजीपाडा विधानसभेचे आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांचे समर्थक आहेत. पण अखेर उमेदवारीची माळ मुख्यमंत्र्यांचे विश्वासू नरेश म्हस्के यांच्या गळ्यात पडली आहे. नरेश म्हस्के ठाण्याचे महापौर सुद्धा होते. 2012 पासून ते ठाणे महापालिकेवर सातत्याने निवडून गेले आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर इथे दोन गट पडले आहेत. ठाकरे गटाने ठाण्यातून विद्यमान खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यांच्या विरोधात आता शिंदे गटाने नरेश मस्के यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
तर, कल्याण मतदारसंघावरही भाजपाने दावा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र स्थानिक नेत्यांबरोबरच अगदी राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी केलेला हा प्रयत्न शिंदे गटाने यशस्वीपणे परतवून लावला आहे. आता कल्याणमध्ये डॉ. श्रीकांत शिंदेंसमोर वैशाली दरेकरांचे आव्हान असणार आहे. वैशाली दरेकर यांना ठाकरे गटाने तिकीट दिले आहे. त्यामुळे कल्याणमधली लढत ही अटीतटीची होऊ शकते.