शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi
चांगल्या कामाबद्दल अभिवादन करणे तसेच सन्मान करणे ही तर शिवसेनेची खरी संस्कृती असून आम्ही आपला आदर करतो.
आजपर्यंत आम्ही नगरपंचायतमधील सर्व महिला नगराध्यक्षांचा सन्मानच केलेला आहे. शिवालयावर मोर्चा आणणार असाल तर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही पायघड्या घालू, असा ठाकरी शैलीत शिवसेना नेते कमलाकर कोते यांनी सत्ताधार्यांना टोला लगावला आहे.
शिवसेनेच्यावतीने गुरुवारी सकाळी शिर्डी नगरपंचायत आवारात शहरातील नागरिकांची वाढीव घरपट्टी तसेच पाणीपट्टी माफ करावी यासाठी नगरपंचायतीच्या कागदी बिलांची होळी करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते कमलाकर कोते बोलत होते.
याप्रसंगी तालुकाप्रमुख संजय शिंदे, शहर प्रमुख सचिन कोते, विजयराव जगताप, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अनिताताई जगताप, तालुकाप्रमुख कस्तुरी मुदलियार, शहरप्रमुख लक्ष्मी आसने, तालुका संघटक स्वाती परदेशी, मीनाक्षी डुबल, संगीता जगताप, तालुका उपप्रमुख अक्षय तळेकर, अमोल गायके, राहुल गोंदकर, सोमनाथ महाले, जयराम कांदळकर, बाळासाहेब ठाकरे, हरीराम राहणे, विलास कोते, तालुका उपप्रमुख पुंडलिक बावके, सोमनाथ विष्णू कोते, नवनाथ विश्वासराव, चंद्रकांत गायकवाड, अनिल पवार, मच्छिंद्र गायके, संतोष जाधव, विश्वजीत बागुल, भागवत चोळके, अमोल महाले, सचिन आवटी, सुनील भाऊ बाराहाते आदी शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांनी घरपट्टी, पाणीपट्टी संदर्भात शिवसेनेवर टीका करत त्या म्हणाल्या की, त्यांच्या खुर्चीला निवेदन चिकटवून महिला नगराध्यक्षांचा अपमान केला. तसेच शिवसेनेची सत्ता असताना घरपट्टी वाढली. यावर उत्तर देताना शिवसेना नेते कमलाकर कोते म्हणाले की, तुमचा राजकीय अभ्यास कमी आहे.
आमच्या काळात आम्हीच नागरिकांच्या हरकती नोंदवून समिती नेमून 17 टक्के घरपट्टी कमी केली. तुम्ही पण विखे पॅटर्नप्रमाणे बोलायचे एक व करायचे एक असे वागत आहात. शिर्डी नगरपंचायत ‘क’ वर्ग असल्याने न. पा. अधिनियम कलम 107 नुसार कर कमी किंवा रद्द करण्याचा अधिकार आहे. तशी शिफारस शासनास करू शकतात व होणारी घट न.पा. आपल्या खात्यातून भरू शकते.
असे असताना नगरपालिका सत्ताधारी गटाचे नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरपंचायतमध्ये दि. 18 जून 2020 रोजी बैठक घेतली त्यामध्ये नागरिकांनी तक्रारी केल्या व ठराव करून शासनास सादर करावा, अशी मागणी केली. आजपर्यंत तीन महिने झाले तरी देखील न. पं.ने ठराव शासनास सादर केलेला नाही व त्यासाठी पाठपुरावा देखील केलेला नाही.
त्यामुळे हा तर विखे पॅटर्न आहे. जे बोलायचे ते करायचे नाही. नगरपंचायतीने पुन्हा घरपट्टी, पाणीपट्टीचे बिले वाटप सुरू केले आहे. हे नागरिकांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखे आहे. तुम्ही जेव्हा शिवालयावर मोर्चा घेऊन याल तेव्हा तुमच्या स्वागतासाठी आम्ही हजर राहू मात्र मोर्चाला आपल्या नेत्याला पण बोलवा. असे आवाहन शिवसेनेच्या वतीने त्यांनी केले आहे. यावेळी सत्ताधारी गटाचा निषेध व्यक्त करत घोषणा दिल्या.
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने तेथील नागरिकांची पाणीपट्टी, घरपट्टी माफ केली आहे तर शिर्डी नगरपंचायतमध्ये का होऊ शकत नाही. राजकीय पुढार्यांनी सरकारला दोष देण्यापेक्षा शिर्डी नगरपंचायतमध्ये भाजपची सत्ता असल्याने त्यांना या गोष्टी शक्य आहे. येत्या आठ दिवसांत सदरचा प्रश्न मार्गी लावला नाही तर जिल्हा महिला आघाडीच्यावतीने उपोषणास बसणार आहे.
– अनिताताई जगताप, जिल्हाप्रमुख शिवसेना महिला आघाडी