अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
करंजी घाट परिसरात वाहन अडवून लुटमार करणार्या सराईत चोरट्यांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत गजाआड करण्यात यश मिळविले आहे. या कारवाईत पोलिसांनी 7 लाख 90 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, एका संशयित आरोपीचा शोध सुरू आहे.
शिवाजी बाळासाहेब पाटेकर (वय 32, रा. ढोरजळगाव, ता. पाथर्डी) हे 16 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.45 वाजता त्यांच्या कारमधून प्रवास करत असताना करंजी घाटात त्यांना लुटले होते. पाटेकर यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत होते. पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीष भोये व त्यांच्या पथकाने संकेत चिंधू पडवळ (वय 25) व नामदेव बाळासाहेब भोकसे (वय 28, दोघे, रा. कुरकुंडी, ता. खेड, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले.
दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचा साथीदार जगदीश सुरेश शिवेकर (रा. करंजविहिरे, ता. खेड, जि. पुणे) याच्यासोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. मात्र शिवेकर सध्या पसार असून त्याचा शोध सुरू आहे. ताब्यातील आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार, दोन मोबाईल असा एकूण 7 लाख 90 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.





