कर्जत |प्रतिनिधी| Karjat
कर्जत तालुका सहकारी दूध संघाला 1 कोटी 25 लाख रुपयांना फसवणार महेश लक्ष्मण जोशी यास अटक करण्यात कर्जत पोलीसांना यश आले आहे. कर्जत तालुका सहकारी दूध संघ, याचप्रमाणे राज्यातील अनेक दूध संस्थांची जोशी याने 9 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे.
महेश लक्ष्मण जोशी (रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) असे या भामट्याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश जोशी हा एल व्ही डेअरी या नावाने दूध व्यवसाय करत आहे. त्याला कर्जत तालुका दूध सहकारी संघाने सन 2020 साठी दिलेल्या दुधापोटी 1 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली. जोशी याने संघाला धनादेश दिला होता. मात्र तो वटला गेला नाही.
यामुळे कर्जत दिवाणी न्यायालयात दूध संघाने महेश जोशी याच्यावर सन 2022 साली खटला दाखल केला आहे. मात्र तेव्हापासून तो गायब होता महेश जोशी हा गेले अनेक दिवसांपासून भारत देशाच्या बाहेर राहून व्यवहार करत होता. त्यावर पोलीस लक्ष ठेवून होते. तो भारतात येताच कर्जत पोलिसांनी त्याला पुणे विमानतळावरती जेरबंद केले. त्यास कर्जत येथील न्यायालयामध्ये आज हजर केले होते. कर्जत न्यायालयायाने जोशी यास जामीन नाकारत न्यायालयीन कोठडी दिली आहे.