कर्जत |प्रतिनिधी| Karjat
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्यावतीने दि. 26 ते 30 मार्च या कालावधीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आमदार रोहित पवार हे या स्पर्धेचे संयोजक आहेत. अंतिम कुस्तीसाठी शरद पवार उपस्थित राहणार आहेत. अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्यावतीने 2 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली होती. अंतिम कुस्ती स्पर्धेमध्ये निकालावरून गोंधळ झाला. अंतिम स्पर्धेच्या निकालाचे कुस्ती क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले. यानंतर रोहित पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेत कर्जत येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्यावतीने पुन्हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याची घोषणा केली.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही अतिशय मानाची कुस्ती स्पर्धा म्हणून ओळखली जाते. कर्जत येथील नगर रोडवरील दादा पाटील महाविद्यालयासमोरील मैदानामध्ये खास स्टेडियमची उभारणी करण्यात आली आहे. कुस्ती शौकिनांसाठी चार गॅलरी उभ्या करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी उपस्थित असणार्या सर्वच राजकीय नेत्यांसाठी तीन मोठे व्यासपीठ उभा करण्यात आलेले आहेत. उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी ते आच्छादित करण्यात येणार आहे. याशिवाय या स्पर्धेसाठी गादी व मातीचे असे दोन प्रेक्षकांना सहज पाहता येतील अशी मैदान तयार करण्याची काम सुरू आहे. प्रेक्षक गॅलरी उभी राहिली असून, निमंत्रितांसाठी खास वातानुकलित दोन मोठे व्यासपीठ उभा करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष कुस्ती ज्या आखाड्यामध्ये होणार आहे त्यासाठी असणारी लाल माती आणून ती व्यवस्थित करून मैदान तयार करण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. गादीवरील कुस्तीसाठी मैदान तयार करण्याचे काम सुरू आहे. कुस्ती उशिरापर्यंत सुरू राहणार असल्यामुळे लाईटची व्यवस्था करण्यात येत आहे.
दरम्यान, कर्जत येथे होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवानांनी सहभागी होऊ नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्यावतीने देण्यात आला आहे. यामुळे आता या स्पर्धेत किती पैलवान राज्यांमधून सहभागी होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद या संघटनेची सन 1953 साली कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी स्थापना केली आहे. याच परिषदेच्या माध्यमातून देशामध्ये मानाची असणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा प्रत्येकवेळी भरवली गेली. व विजेत्या पहिलवानास चांदीची गदा देण्याची कुस्ती परिषदेची परंपरा आहे. राज्यामध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर संघ ही दोन वर्षांपूर्वी नवीन कुस्ती संघटना स्थापन झाली. या संघटनेला मान्यता देऊ नये यासाठी न्यायालयामध्ये संघर्ष दोन्ही कुस्ती संघटनांमध्ये सुरू होता. न्यायालयाने नुकताच काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र कुस्तीगीर संघाला देखील मान्यता दिली आहे यामुळे आणखीच गोंधळ निर्माण झाला आहे.
1000 मल्ल सहभागी होणार
या कुस्ती स्पर्धेमध्ये किमान 1000 राज्यातील नामांकित पैलवान सहभागी होतील. कुस्तीगीर परिषद हीच अधिकृत संघटना आहे. या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना देश पातळीवर शासनाकडून विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हीच अधिकृत आणि सर्वात जुनी संघटना आहे, असा दावा देखील या समितीच्या वतीने करण्यात आला आहे.
राजकीय आखाडा गाजणार
स्पर्धेची जाहिरात करण्यासाठी पुरेशा यंत्रणा मतदारसंघासह राज्यामध्ये काम करत आहेत. या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आले असून त्यांच्या बैठका व तयारी याचा आढावा रोहित पवार घेत आहेत. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातच होत असणारी ही दुसरी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मैदानावर तसेच मैदानाच्या बाहेर राजकीय आखाड्यावर देखील गाजणार हे निश्चित आहे.