कर्जत |प्रतिनिधी| Karjat
कर्जतच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्याविरोधात नव्या कायद्यानुसार दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर जिल्हाधिकार्यांनी आज सोमवारी (दि. 21) सकाळी अकरा वाजता विशेष सभा आयोजित केली आहे. नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये होणार्या या सभेसाठी पीठासन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी नितीन पाटील यांची नियुक्ती केली आहे. या अविश्वास प्रस्तावावर काय निर्णय होणार? याकडे मतदारसंघासह राज्याचे लक्ष लागले आहे. कर्जत नगराध्यक्षपदाच्या अग्नीपरीक्षेत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कर्जत नगरपंचायत आ. रोहित पवार यांच्या ताब्यात आहे. त्यांना धक्का देण्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तब्बल आठ नगरसेवक फोडले आहेत. नव्या कायद्यासाठी शिंदे यांनीच पाठपुरावा केला आहे. त्यानुसार नव्याने कर्जतच्या नगराध्यक्ष राऊत यांच्या विरोधात सत्ताधारी 11 नगरसेवकांसह विरोधी भाजपाच्या 2 अशा 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. कर्जत नगरपंचायतमध्ये महाविकास आघाडीत देखील फूट पडली आहे. काँग्रेसचे तीन नगरसेवक देखील रोहित पवार यांच्या विरोधात गेले आहेत. रोहित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उषा राऊत यांची नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेस पक्षाच्या रोहिणी घुले यांची निवड करण्यात आली होती. उषा राऊत यांना अडीच वर्ष नगराध्यक्षपद व रोहिणी घुले यांना दीड वर्ष उपनगराध्यक्षपद असे समीकरण ठरले होते. अडीच वर्षाची मुदत संपल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि महायुती सरकारने राज्यातील सर्व नगरपंचायत व नगरपालिकांमध्ये विद्यमान नगराध्यक्षांना मुदतवाढ जाहीर केली. त्यानंतर उपनगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी राजीनामा दिला नाही. मात्र, राऊत यांनी दोन्ही पदांचे राजीनामे एकत्रित घ्या अशी मागणी केली. मात्र, ती नगरसेवकांना योग्य वाटली नाही त्यामुळे 13 नगरसेवक 6 एप्रिलला सहलीला निघून गेले. 7 एप्रिलला त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. 16 एप्रिलला या अविश्वास प्रस्तावावर प्रांताधिकार्यांनी सुनावणी ठेवली होती. मात्र ती रद्द करण्यात आली. त्याचदिवशी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरसेवकांमध्ये बहुमत असल्यास तेच नगराध्यक्षांना पदावरून दूर करू शकतात असा निर्णय घेण्यात आला.
विशेष म्हणजे त्याचदिवशी राज्यपालांच्या सहीचा अध्यादेशही राज्यामध्ये लागू करण्यात आला. यावर आ. पवार यांनी विधान परिषदेचे सभापती शिंदे यांनी त्यांच्याकडे असणार्या पदाचा गैरवापर करत, भारतीय जनता पक्ष केवळ सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही पातळीवर पुन्हा एकदा गेला आहे अशी जोरदार टीका केली होती. यामध्ये नगरसेवकांना पोलीस प्रशासनाचा दबाव, ठेकेदारांची बिले अडवणे, आर्थिक आम्हीच दाखवणे असे प्रकार केल्याचा आरोपही पवार यांनी आहे. या राजकीय नाट्यानंतर आज होणार्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नूतन अध्यादेशानूसार राज्यातील पहिलाच निकाल कर्जतमध्ये होणार का? हे आज स्पष्ट होणार आहे.
चोख पोलीस बंदोबस्त
सर्व राजकीय व इतर परिस्थितीचा विचार करता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अविश्वास प्रस्तावावरील विशेष सभेवेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नगर येथून अतिरिक्त पोलीस फोर्स, मागवण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली.
दोन गटनेत्यांमुळे पेच
कर्जत नगरपंचायतमध्ये संतोष मेहत्रे यांना यापूर्वी सर्व 15 नगरसेवकांच्या एकत्रित गटाचे गटनेते म्हणून निवडण्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्षांनी कर्जत नगरपंचायतच्या गटनेतेपदी अमृत काळदाते यांची निवड जाहीर केली. तसे पत्र देखील जिल्हाधिकार्यांंना देण्यात आले. यामुळे दोन गटनेते आहेत. यामुळे कोणाचा आदेश कायदेशीर मानला जाणार? असा पेच निर्माण झाला आहे. यामुळे नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर सभागृहामध्ये कोणताही निर्णय झाला तरी तो न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.