कर्जत |प्रतिनिधी| Karjat
सर्वांचे लक्ष लागलेल्या कर्जतच्या नगराध्यक्षपदी काँग्रेस पक्षाच्या रोहिणी सचिन घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे. अधिकृत घोषणा येत्या 2 मे ला होणार आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी (दि.29) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या व रोहित पवार यांच्या समर्थक प्रतिभा भैलुमे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी रोहिणी घुले यांचा एकमेव अर्ज राहिला आहे, अशी माहिती मालिकेचे मुख्याधिकारी अक्षय जायभाय यांनी दिली. कर्जत नगरपंचायत च्या सन 2022 साली झालेल्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन झाली होती. 17 पैकी 12 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे व तीन नगरसेवक काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते. भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या.
नगराध्यक्ष पदासाठी त्यावेळी देखील अनेकजण इच्छुक होते. कोणाची वर्णी या पदासाठी लागणार याकडे लक्ष लागले होते. रोहित पवार यांनी अडीच वर्षांसाठी अध्यक्षपदी उषा राऊत उपनगराध्यक्ष पदासाठी रोहिणी घुले यांना संधी दिली. मात्र अडीच वर्षाच्या या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांमध्ये सातत्याने धूसफुस सुरू होती. मात्र अडीच वर्षांची मुदत संपल्यानंतर उषा राऊत यांना राज्य सरकारच्या नियमामुळे पुन्हा संधी मिळाली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नगरसेवकांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांमध्ये फूट पाडली आणि अकरापैकी तब्बल आठ नगरसेवक फोडले. काँग्रेस पक्षाचे तीन नगरसेवक देखील नाराज असल्यामुळे ते पण सोबत आल्यामुळे राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा तेरा नगरसेवकांची मोट बांधली गेली.
गटनेते फुटल्यामुळे रोहित पवार यांना कोणतीही संधी मिळाली नाही. एवढेच नव्हे तर राम शिंदे यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यामध्ये असणार्या त्रुटी पाहून राज्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत कायद्यामध्ये बदल केला आणि नवीन कायदा अविश्वास प्रस्तावासाठी लागू केला. रात्री बारा वाजता राज्यपालांनी त्या अध्यादेशावर सही केली. आणि त्यानंतर लगेचच अविश्वास प्रस्तावाची तारीख जाहीर करण्यात आली. प्रत्येकवेळी विरोधकांना कोणतीही संधी न्यायालयामध्ये जाण्याची राहणार नाही याची पूर्ण काळजी राम शिंदे यांनी घेतली होती. अशा पद्धतीने योग्य डावपेच आखत राम शिंदे यांनी रोहित पवार यांना पूर्णपणे नामोहरम केले.
उषा राऊत यांनी अविश्वास प्रस्तावाला सामोरे न जाता राजीनामा दिला. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याचा त्यांच्या विरोधकांचा डाव यशस्वी झाला नाही. राऊत यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली. दिनांक 28 तारखेला उमेदवारीअर्ज भरण्यात आले. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रोहिणी सचिन घुले यांनी तर रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रतिभा भैलुमे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. बहुमत नसताना देखील भैलुमे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे पुन्हा नगरसेवकांमध्ये फूट पडणार का अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, भैलुमे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे रोहिणी घुले नगराध्यक्ष झाल्या आहेत.
गटनेता कोण ? न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गटनेता म्हणून अमृत काळदाते व उपगटनेता म्हणून प्रतिभा भैलुमे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तशी, नोंद जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करावी अशी मागणी करणारा अर्ज 17 एप्रिलला सादर केला होता. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी 25 तारखेला रात्री नऊ वाजता निकाल देऊन अमृत काळादाते यांचे प्रकरण विनाविलंब कार्यवाही करत निकाली काढले. या निकालाच्या विरुद्ध औरंगाबाद खंडपीठामध्ये अमृत काळदाते यांनी याचिका दाखल केली होती. याबाबत काळदाते यांचे वकील महेश देशमुख यांनी माहिती सांगितली की, जिल्हाधिकारी यांच्या निकालाच्या विरोधात न्यायाधीशांसमोर आम्ही मांडणी केली की, जिल्हाधिकारी हे प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी प्रशासकीय काम करण्याची आवश्यकता असताना तसे केले नाही व संख्या तपासणी हा त्यांचा अधिकार नाही तरी त्याचा वापर केला. यामुळे आमच्या नैसर्गिक न्याय हक्काची पायमल्ली झाली. यावर सरकारी वकील यांनी जिल्हाधिकारी यांची सर्व बाजू मांडताना उद्या सकाळपर्यंत आम्हाला वेळ द्यावा अशी विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने वेळ दिली आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विद्यमान गटनेते संतोष मेहत्रे यांनी देखील औरंगाबाद खंडपीठामध्ये जिल्हाधिकारी यांनी दिलेला निर्णय योग्य असल्याची बाजू वकिलांच्या माध्यमातून मांडली आहे.