Friday, November 22, 2024
Homeनगरकौठवाडीमध्ये डोक्यावर पेटते कठे घेऊन बिरोबाला नवस

कौठवाडीमध्ये डोक्यावर पेटते कठे घेऊन बिरोबाला नवस

राज्यभरातील भाविकांची मोठी गर्दी || पोलिसांचा चोख बंदोबस्त

अकोले |प्रतिनिधी| Akole

अनेक वर्षांपासून परंपरागत भरणारी कौठवाडी येथील कठ्याची यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. डोक्यावर मडके (कठे) घेतलेले भाविक, मडक्याला छिद्रे पाडून, मडक्यात उकळलेले तेल टाकून नवस फेडणारे व बोलणारे भाविक हे दृश्य रात्रीच्या अंधारात उठून दिसत होते. रात्रभर उत्साहात व पेटत्या कठ्यांच्या उजेडात परिसर उजळून काढणारी ही यात्रा पाहण्यासाठी, तसेच देवाला नवस बोलण्यासाठी राज्यभरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

- Advertisement -

अकोले तालुक्यातील कौठवाडी गावात श्री बिरोबा देवाचे मंदिर आहे. कठ्याच्या यात्रेमुळे हे गाव सर्वदूर प्रसिद्ध झाले आहे. यंदा देखील नगर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, धुळे, कल्याण, विदर्भातून लोकांनी येथे यात्रेसाठी गर्दी केली होती. कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी देवाला ‘कठा’ लावून नवस बोलला जातो. हा नवस पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. कठा म्हणजे मडक्याची घागर. मडक्याची वरची बाजू कापून त्यात खैर, साग, चंदन अशी विविध प्रकारची लाकडे व समिधा टाकून घागर पूर्ण भरतात. त्यात गोडेतेल टाकून चांगली भिजवतात. घागरीच्या चोहोबाजूंनी पांढरेशुभ्र कापड गुंडाळून, वरच्या टोकाला मंदिरासारखा आकार करतात. हे कठे बिरोबा मंदिरात ठेवतात. साकिरवाडी येथून 8 वाजता मानाची काठी येते व बिरोबा की जय अशा घोषात ढोल-ताशांच्या गजरात कठे पेटवले जाऊन यात्रेला सुरूवात होते.

मंदिराभोवती उघड्या अंगाने, डोक्यावरून संपूर्ण शरीरावर वाहत असलेले तेल, डोक्यावरचा अग्नी अशा वातावरणात हे दृश्य पाहणार्‍यांच्या अंगाला काटा येतो. यंदा 74 कठे पेटवले होते. भाविकांची संख्याही वाढत असल्याची माहिती अध्यक्ष दत्ता भोईर यांनी दिली. साकिरवाडी येथून मानाच्या काठीचे आगमन झाले आणि पुजार्‍याच्या अंगात येताच कठे पेटले व मोठा अग्नीचा भडका झाला. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पेटलेले कठे आले. बिरोबा की जय म्हणत मंदिराभोवती पाच फेरे मारून भाविकांनी नवस फेडले.

यावेळी अध्यक्ष दत्ता भोईर, सरपंच लता धादवड, उपसरपंच लता भोईर, राजेंद्र धादवड, शंकर साबळे, भरत धादवड, महेश भांगरे, विठ्ठल भोईर, ज्ञानदेव भांगरे आदिंसह यात्रा समिती व ग्रामस्थांनी नियोजन केले होते. तर राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, शेख, पोलीस कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या