केदारनाथमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास केदारनाथमध्ये एक हेलिकॉप्टर क्रॅश लँडिंग करताना दिसले. हे हेलिकॉप्टर एम्स ऋषिकेशच्या वैद्यकीय सेवेसाठी वापरले जात होते. लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे अपघातासारखे दृश्य निर्माण झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सकाळी साधारण 11 वाजता हे हेलिकॉप्टर केदारनाथ परिसरातून उड्डाण करत होते. त्यात एक डॉक्टर, एक पायलट आणि रुग्णालयातील एक कर्मचारी प्रवास करत होते. हे हेलिकॉप्टर रुग्णाला घेऊन एम्स ऋषिकेशकडे जात होते. मात्र हवेत असताना हेलिकॉप्टरच्या मागच्या भागात अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाली. परिणामी, पायलटने तत्काळ परिस्थिती ओळखून क्रॅश लँडिंगचा निर्णय घेतला.
https://x.com/Dubeyjilive/status/1923634922767474751
या अपघातसदृश घटनेनंतर प्रशासनाकडून त्वरीत प्रतिक्रिया देण्यात आली. गढवाल विभागाचे आयुक्त विनय पांडे यांनी स्पष्ट केले की, “हेलिकॉप्टरने यशस्वीपणे लँडिंग केले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.” हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी – डॉक्टर, पायलट आणि कर्मचारी – पूर्णतः सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली.
पायलटने घेतलेला त्वरित निर्णय आणि दाखवलेले प्रसंगावधान यामुळे मोठा अनर्थ टळला. रुद्रप्रयाग जिल्ह्याचे पर्यटन अधिकारी संदीप कुमार यांनीही यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, “पायलटच्या हुशारीमुळे गंभीर दुर्घटना टळली असून यासाठी त्याचे कौतुक करणे गरजेचे आहे.” दरम्यान, केदारनाथ धाम यात्रा नुकतीच सुरू झाली असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी केदारनाथ धामात हजेरी लावली. अशा वेळी झालेल्या या क्रॅश लँडिंगमुळे थोडा काळजीचा क्षण निर्माण झाला असला, तरी ही घटना सुदैवाने धोक्याच्या पातळीवर गेली नाही.