नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
केदारनाथहून चार धाम यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी पहाटे रुद्रप्रयागच्या गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण यांच्या दरम्यानच्या जंगलामध्ये क्रॅश झाले. यामध्ये ७ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टरमध्ये एकूण ७ प्रवासी होते. अपघातानंतर रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून बचावकार्य सुरू आहे. या अपघाताचे मुख्य कारण खराब हवामान असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. मृतांमध्ये पायलट आणि एका दोन वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.
रविवारी सकाळी उत्तराखंडमधील केदारनाथजवळ एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह ७ जण होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशनचे होते आणि ते गौरीकुंडजवळ बेपत्ता झाले होते, अशी माहिती उत्तराखंडचे अतिरिक्त महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी दिली.
आर्यन एव्हिएशन कंपनीचे हे हेलिकॉप्टर केदारनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सेवा देत होते. यात्रेच्या हंगामात हजारो भाविक हेलिकॉप्टरद्वारे केदारनाथ धाम गाठत असतात. दरम्यान, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल होत असून जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
देहरादूनहून केदारनाथला जात असताना आज सकाळी त्रिजुगीनारायण आणि गौरीकुंड दरम्यान हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते. अपघाताच्या वेळी गौरीकुंडवर गवत कापत असताना काही महिलांनी अपघात पाहिला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. हेलिकॉप्टर गौरी माई खार्कच्या वरच्या जंगलात पडले आहे. मृतदेह हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून पोलिसांनी ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. हेलिकॉप्टर अपघातात बीकेटीसी कर्मचारी विक्रम सिंह रावत यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
Uttarakhand helicopter crash | Today, at around 5:20 am, a helicopter, which was going from Shri Kedarnath Dham to Guptkashi, crashed near Gaurikund. There were six passengers, including the pilot (5 adults and 1 child)
(Source: SDRF) pic.twitter.com/IcNwq7MibJ
— ANI (@ANI) June 15, 2025
मृतांत महाराष्ट्रातील भाविक
मृतांमध्ये महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील ३ जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघेही केदारनाथला दर्शनासाठी गेले होते. पहाटेच्या सुमारास देवदर्शनासाठी जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत आणखी काही भाविक होते.
मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे राहणाऱ्या जयस्वाल कुटुंब मरण पावले आहे. राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल, काशी राजकुमार जयस्वाल अशी या मृतांची नावे आहेत. राजकुमार जयस्वार हे पत्नी श्रद्धा आणि मुलगी काशीसोबत १२ जून रोजी वणी इथून केदारनाथसाठी गेले होते. पण देवदर्शन करण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि अख्ख्या कुटुंबाचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





