कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव शहरातील खडकी येथे कारखान्यात मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्रे बनविण्यात येत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी या परिसरात छापा टाकून शस्त्र बनविणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. शस्त्र कारखान्यातील दोघांचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खडकी भागात राणी ज्ञानेश्वर पवार यांच्या घराच्या पाठीमागे त्यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये धारदार शस्त्र, तलवारी बनवणारा कारखाना सुरु आहे. त्यावरून पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे व किशोर कुळधर हे खडकी येथे जावून पाहाणी करत होते. इतक्यात पोलीस आल्याची चाहुल लागतात संबंधित पत्र्याच्या शेडमध्ये तलवारी तयार करणारे किरण सोळसे, बक्या ऊर्फ महेश म्हस्के हे दोघे तेथून आपल्या हातील मोबाईल व बनवलेल्या 9 तलवारीसह इतर साहित्य तिथेच टाकून पळवून गेले. दरम्यान, पोलिसांना हत्यार बनवणारा कारखाना असल्याची खात्री पडताच त्यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना घटनेची माहीत दिली.
देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, सहायक पोलीस निरीक्षक मयुर भामरे, पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे व इतर पोलीस कर्मचार्यांना घटनास्थळी पाठवून दोन पंचासमक्ष पंचनामा केला असता तिथे 9 नवीन तयार केलेल्या तलवारी, हत्याराला धार देण्यासाठी लागणार्या 7 चकत्या, लोखंडी ऐरण, हातोडा, दोन मोबाईल असा सर्व मिळून 18 हजार 900 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पत्र्याचे शेड हे राणी ज्ञानेश्वर पवार यांच्या मालकीचे असून तिथे तात्पुरत्या स्वरुपात किरण सोळसे व महेश म्हस्के दोघे यांना भाड्याने दिल्याचे समजले. पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे यांच्या फिर्यादीवरून किरण सोळसे व महेश म्हस्के यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.