खंडाळा |वार्ताहर| Khandala
श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या सदोष पिंजर्यातील बोकडावर बिबट्याने यथेछ ताव मारला. बिबट्या तर अडकला नाहीच मात्र शेतकर्याने पिंजर्यात ठेवलेला बोकड मात्र बिबट्याची शिकार झाला.
खंडाळा गावाच्या उत्तर दिशेला प्रवरा कालवा परिसरात शेखर ढोकचौळे, सचिन शेळके, रावसाहेब पिनाटे, विजय ढोकचौळे, महेश मरकडे, बाबासाहेब खांडेकर, बाळासाहेब ढोकचौळे यांच्या शेतजमिनी आहेत. फळबागा व ऊसशेती जास्त असल्यामुळे बिबट्यांसाठी वास्तव्यास अनुकुल वातावरण आहे. शेतकर्यांना अनेक वेळा बिबट्यांचे दर्शन झाले आहे. विजय ढोकचौळे यांच्यापासून काही अंतरावर दोन दिशेला दोन बिबटे असाही प्रसंग घडला होता. वनविभागाला याबाबत माहिती दिली असता त्यांचेकडून पिंजरा मिळाला. त्यात बोकड ठेवण्यात आला.
प्रतिक्षा होती दोन मोठे बिबटे किंवा त्यांचे मध्यम वयाचे दोन बछडे यापैकी कोणीतरी पिंजर्यात अडकेल. बिबट्या तर नाही अडकला मात्र पिंजर्यातील बोकड बिबट्याने फस्त केला. पिंजर्याजवळ शेतकर्यांनी जाऊन पाहिले असता नादुरुस्त असलेल्या पिंजर्याच्या एका बाजूकडून बोकडाला ओढण्यात बिबट्या यशस्वी झाला. पिंजर्याच्या एका बाजूला फट होती. पंज्याच्या सहाय्याने त्याच फटीतून बोकड बाहेर ओढल्याचे त्याठिकाणी दिसून आले. पिंजर्यात न अडकणारे बिबटे यापूर्वी अडकलेले असावेत, त्यामुळे ते पुन्हा पिंजर्याजवळ फिरकत नाही, असा काही शेतकर्यांचा अंदाज आहे.