अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पाथर्डी तालुक्यातील खांडगाव येथे घडलेल्या थरारक दरोडा प्रकरणातील तीन पसार संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या संशयित आरोपींकडून चौकशीदरम्यान जिल्ह्यातील आणखी पाच जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे.
31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्रिभुवनवाडी- खांडगाव रस्त्यावर खांडगाव (ता. पाथर्डी) येथे हा दरोड्याचा प्रकार घडला होता. स्विफ्ट कारने ट्रॅव्हल्स अडवून पाच ते सहा चोरट्यांनी ट्रॅव्हल्समध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. जीवे ठार मारण्याची धमकी देत गावठी पिस्तूल व चाकूसारख्या हत्यारांचा धाक दाखवून प्रवाशांकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने लुटून आरोपी पसार झाले होते. या प्रकरणी नाशिक येथील रहिवासी पवन सुखदेव खैरनार (वय 36) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात यापूर्वी चार संशयित आरोपी अटक करण्यात आले होते, तर पाच संशयित आरोपी पसार होते.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. रविवारी (14 डिसेंबर) मिळालेल्या माहितीनुसार पसार आरोपी करंजी घाटातील दगडवाडी शिवारातील डोंगर परिसरात लपून बसल्याचे समजले. पथकाने तत्काळ कारवाई करत पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले.
सलमान जमादार पठाण (वय 24, रा. करंजी, ता. पाथर्डी), ओम बाळासाहेब वांढेकर (वय 19, रा. खांडगाव, ता. पाथर्डी), सोफीयान फारूख भालदार (वय 19, रा. शेवगाव) अशी त्यांची नावे आहेत. सखोल चौकशीत आरोपींनी खांडगाव दरोड्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडून पाथर्डी व शेवगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील आणखी पाच जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. याच तपासात साहिल उर्फ बिट्या शाकीर शेख (वय 18, रा. माळीबाभुळगाव, ता. पाथर्डी) व विवेक एलिया बनकर (वय 24, रा. करंजी) यांना भोसे व मढी (ता. पाथर्डी) येथून ताब्यात घेण्यात आले आहे.




