अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर, मूग, बाजरी, मका आणि इतर खरीप पिकांची वाढ चांगली झाली आहे. जिल्ह्यातील खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. खरीप हंगामातील 585 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा अधिक आली आहे. जिल्ह्यात यावर्षी 628 मि.मी. (140 टक्के) पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांची परिस्थिती जोमात आहेत. जिल्ह्यात 1 हजार 606 महसुली गावे आहेत. त्यापैकी 585 गावे खरीप तर उर्वरित 1 हजार 21 गावांचा रब्बी हंगामातील पिकांचा मुख्यत्वे समावेश आहे. खरीप हंगामासाठी दहा तालुके असून त्यापैकी संगमनेर व अकोले या दोन्ही तालुक्यांतील सर्वच 365 गावे खरीप हंगामात समाविष्ट आहेत. याशिवाय आठ तालुक्यांतील काही मोजक्याच गावांचा समावेश आहे.
यावर्षी जून-जुलै या दोन महिन्यांत खरीप पिकांची पैरणी शंभर टक्क्यांपेक्षा अधिक झाली. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मुळा, भंडारदरा या धरणांतूनही पिकांसाठी आवर्तन सोडण्यात आले होते. ज्या शेतकर्यांना खरीप हंगामातील पिकांना पाणी पाहिजे होते, त्यांना उपलब्ध झाले आहे. 585 गावांतील खरीप पिकांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक आढळून आली आहे. 31 ऑक्टोबर रोजी सुधारित पैसेवारी जाहीर होणार आहे. 50 पेक्षा अधिक जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नुकतीच खरीष पिकांची पैसेवारी जाहीर केली.
खरीप पिकांची पैसेवारी तीन वेळा जाहीर केली जाते. 15 सप्टेंबर रोजी नजर अंदाज, 31 ऑक्टोबरला सुधारित आणि 15 डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते. अंतिम पैसेवारीत ज्या गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी येते, त्या गावांत दुष्काळी सवलती जाहीर केल्या जातात, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) अतुल चोरमारे यांच्यावतीने देण्यात आली.
50 पेक्षा अधिक पैसेवारीची गावे
अकोले 191, संगमनेर 174, कोपरगाव 16 राहाता 24, राहुरी 17, नगर 5 नेवासा 13, पाथर्डी 80, शेवगाव 34 आणि पारनेर 31 असे आहेत.