Saturday, May 18, 2024
Homeनगरजनहित आंदोलनप्रकरणी दाखल गुन्ह्याचा टायर जाळून निषेध

जनहित आंदोलनप्रकरणी दाखल गुन्ह्याचा टायर जाळून निषेध

खरवंडी कासार |वार्ताहर| Kharwandi Kasar

पाथर्डी तालुक्यातून जात असलेला निर्मल नांदेड विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे काम चार वर्षांपासून ठप्प आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय महामार्गावरील भुतेटाकळी ते नगरपर्यंत रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, स्थानिकांना टोलमाफी द्यावी आदी मागण्यांसाठी केलेल्या जनआंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा खरवंडी कासार ग्रामस्थांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला.

या मार्गावर भुतेटाकळी ते पाडळशिंगी (जिल्हा बीड) हद्दीपर्यंत 50 किलो मीटरवर टोलनाका बडेवाडी (ता. पाथर्डी) येथे सुरू करण्यात आला आहे. या मार्गाचे अपूर्ण काम पूर्ण व्हावे, स्थानिकांना टोलमध्ये सूट मिळावी, यासाठी जनक्रांती जनआंदोलनाचे अध्यक्ष दत्तात्रय बडे, आपचे किसन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपूर्वी सामाजिक आंतराचे नियम पाळत सरकारी मालमत्तेला धक्का न लावता कोणतेही नुकसान न करता लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन केले.

या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दिग्वीजय पाटणकर, नायब तहसीलदार पंकज नेवसे, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मध्यस्थीनंतर 15 दिवसांत टोलमाफी देण्यासंदर्भात व अपूर्ण रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

त्यांनतर आंदोलकांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेचे तीव्र पडसाद खरवंडी कासार येथे उमटले. नागरीकांनी रस्त्यावर येत पोलीस प्रशासनाविरोधात गुन्हे दाखल केल्यामुळे टायर जाळून निषेध नोंदवला आहे.

आंदोलन लोकशाही मार्गाने शांततेत पार पडले. असे असताना पाथर्डी पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक आंदोलन चिघळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर अ‍ॅम्बुलस फिरवली. वैयक्तीक द्वेषापोटी सुडबुद्धीने पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ते आजतागायत पोलीस प्रशासनाने अनेक गुन्हे राजकीय तडजोडीतून दाखल केले आहेत.

– शैलेंद्र जायभाये, माहिती अधिकार महासंघ.

- Advertisment -

ताज्या बातम्या