Friday, September 20, 2024
Homeनगरखिरविरे येथे सावत्र मुलासह सुनेला पाण्यात बुडवून मारले

खिरविरे येथे सावत्र मुलासह सुनेला पाण्यात बुडवून मारले

अकोले पोलिसांत गुन्हा दाखल || वडिलांसह सावत्र आईला अटक

अकोले |प्रतिनिधी| Akole

- Advertisement -

सावत्र मुलगा व सावत्र सून असल्याच्या कारणावरून दोघांच्या कमरेला एकाच कपड्याने बांधून त्यांना त्यांच्या शेतातील विहिरीमध्ये ढकलून देऊन पाण्यात बुडवून जीवे ठार मारल्याप्रकरणी जन्मदाता वडील आणि सावत्र आईसह चौघांवर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर मयत मुलाचे वडील आणि सावत्र आईला पोलिसांनी गजाआड केले आहे. दोन महिन्यांपूर्वी बहिरू डगळे याच्यासोबत सारिकाचे लग्न झाले होते. तर खिरविरे गावातून डगळे दाम्पत्य 30 जून रोजी रात्री घरी कुणाला न सांगता निघून गेले होते.

परिसरातील आंबेविहीरजवळ विहिरीतील पाण्यात तरंगताना या दाम्पत्याचे मृतदेह नुकतेच आढळून आले होते. यामुळे परिसरात खळबळ उडाली. अकोले पोलिसांनी दोन्ही मृतदेह गावकर्‍यांच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढून ते शवविच्छेदनासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु हे मृतदेह एका कापडाने बांधलेले असल्याने ही हत्या की आत्महत्या? असा प्रश्न नातेवाईकांना पडला. तर मयत बहिरू डगळे याचे मामा एकनाथ रामभाऊ कुलाळ यांनी आपला भाचा व भाचेसून यांनी आत्महत्या केली नसून ती हत्याच असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मयत बहिरू व सारिका डगळे यांंचे मृतदेह लोणी येथील प्रवरा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात येऊन या दोघांच्या मृतदेहावर खिरविरे येथे शुक्रवारी मुलाच्या घरासमोर अंत्यविधी करण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला.

सदर माहिती मिळताच तत्काळ अकोले व राजूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस बंदोबस्तात या दोघांचे अंत्यविधी करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी मयत बहिरू डगळेचा मामा एकनाथ रामभाऊ कुलाळ (वय 29, रा. पाडोशी) यांनी अकोले पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की मयत भाचा बहिरु काळू डगळे (वय 25) व भाचेसून सारिका बहिरु डगळे (रा. खिरविरे) या दोघांनाही मयत बहिरुचे वडील काळू काशिनाथ डगळे, सावत्र आई हिराबाई काळू डगळे, संतोष काशिनाथ डगळे, काशिनाथ लक्ष्मण डगळे (रा. खिरविरे) यांनी एकनाथ कुलाळ यांचे लग्न असल्याने लग्नाला येण्याच्या कारणावरून तसेच सावत्र मुलगा आणि सावत्र सून असल्याच्या कारणावरून दोघांच्या कमरेला एकाच कपड्याने बांधून त्यांना त्यांच्या शेतातील विहिरीमध्ये ढकलून देऊन त्यांना पाण्यात बुडवून जीवे ठार मारले, या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता 2024 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तानाबाई काशिनाथ डगळे (वय 70, रा. खिरविरे, आंबेविहीर) यांनी अकोले पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मयत नातू बहिरु व नातसून सारिका डगळे या दोघांना मारल्याच्या संशयावरून मनात राग धरून एकनाथ रामू कुलाळ, सोमनाथ रामू कुलाळ, रोहन तळपाडे, विजय तळपाडे, रामू साबळे आणि 10 ते 12 लोक (रा. पाडोशी व केळी रुम्हणवाडी) यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गैरकायद्याने मंडळी जमवून बंद घरात अनाधिकाराने शिरून घरातील संसारोपयोगी वस्तू व संपूर्ण सातखणी सागवानी घर, दोन मोटारसायकली, ट्रॅक्टर तसेच धान्याचे पोते पेटवून देऊन नुकसान केले. तसेच शिवीगाळ, दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरून अकोले पोलिसांत वरील लोकांवर भारतीय न्याय संहिता 2024 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या