नाशिक । विशेष प्रतिनिधी Nashik
आमदार हिरामण खोसकरांच्या कारकिर्दीत इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही तालुक्यांतील ‘नाना, मामा, आणि भाऊ’ या मोजक्याच ठेकेदार घराण्यांचा विकास झाला आहे. त्यामुळे मतदारसंघातील विकास कमी होऊन मतदारसंघाचा सत्यानाश मोठ्या प्रमाणावर झाला. तशी भावना मतदारसंघातील जनतेत निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत खोसकरांच्या पराभवाचे कारण ठेकेदारांची घराणेशाहीच ठरणार असे भाकित पंचायत समितीचे माजी सोमनाथ जोशी यांनी वर्तवून आमदार हिरामण खोसकर यांच्यावर टीकास्त्र सोडले.
गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात आमदार निधीतून मंजूर झालेली बरीच काम खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील मोजक्या ठेकेदारांसह त्यांच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर या ठेकेदारांच्या नातेवाईकांनी काही अंगणवाडी, रस्ते, पाण्याच्या टाकीसह छोटी-मोठी कामे पूर्ण न करता बिले मंजूर करून पैसे काढून घेतले. ही कामे पैशाविना अर्धवट पडलेली असून या गावांतील ग्रामस्थांकडून ठेकेदारांसह आमदार खोसकरांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे.
मतदारसंघातील एखाद्या गावातील ग्रामस्थांनी मंजूर झालेले काम ठेकेदाराने चालू न केल्यास किंवा ठेकेदाराच्या कामाची तक्रार आमदारांकडे केल्यास आमदार खोसकर लगेचच त्या ठेकेदाराला फोन करून काम चांगले करण्याची सूचना गेल्या पाच वर्षांत करतांना बघायला मिळाले. मात्र, आमदार खोसकरांची ही वरवरची मलमपट्टी असल्याचे दिसून आले. आमदारांनी ठेकेदाराला फोन करून काम करण्यास सांगितल्यावर ठेकेदार तेवढ्यापुरते होकार देतांना दिसले. मात्र प्रत्यक्षात काम तसेच अर्धवट पडून असल्याचे दिसले. ठेकेदारदेखील आमदारांचे ऐकत नसल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. ठेकेदारांकडून मिळणारी ‘टक्केवारी’ याला जबाबदार असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे, असेही जोशी म्हणाले.
ठेकेदार ‘नाना, मामा आणि भाऊ यांच्यापैकी एकाने आमदार खोसकर यांना एक इनोव्हा गाडी वर्षापूर्वी भेट दिली होती, असे बोलले जाते. गेल्या पाच वर्षांत आमदार खोसकरांनी ठेकेदारांसह त्यांच्या घराण्यांचे भले केले. ठेकेदारांनीही आमदार खोसकरांना खूश ठेवण्यात कुठलीही कसर सोडलेली नाही. आमदार खोसकरांनी त्यांची आमदारकीची पाच वर्र्षेे ठेकेदारांसाठीच खर्ची घातली का? असा सवाल मतदारसंघातील जनता विचारत असल्याचे सोमनाथ जोशी यांनी सांगितले.