अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बालिकाश्रम रस्त्यावरील बडोदा बँक कॉलनी येथील रहिवासी अभियंता वैष्णवकुमार गंगाधर परदेशी (वय 28) यांच्यावर सराईत गुन्हेगार विजु राजेंद्र पठारे रा. सिध्दार्थनगर, अहिल्यानगर) याने चाकूने डोक्यावर सपासप वार करून हल्ला केल्याची घटना रविवार (15 डिसेंबर) रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात वैष्णवकुमार परदेशी हे जखमी झाले असून त्यांच्यावर येथील जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले. भर वस्तीत रस्त्यावर घडलेल्या या हल्ल्याची घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
याबाबत रात्री उशिरा वैष्णवकुमार यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात विजू पठारे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी देण्यात आलेल्या फिर्यादीत वैष्णवकुमार यांनी म्हटले आहे की, मी व्यवसायाने सिव्हील इंजिनियर असून मी माझे घरप्रपंच चालवितो. तसेच आमचे घरी किराणा दुकान असून किराणा दुकानाचे काम माझी आई व मी असे आम्ही दोघे मिळून पाहतो. दिनाक 15 डिसेंबर रोजी रात्री 8:15 वाजेच्या सुमारास मी कामावरून आल्यावर माझ्या किराणा दुकानाचे काउंटरवर बसून मोबाईल पाहत बसलेलो असताना विजू पठारे याने विनाकारण दुकानासमोर येऊन अचानक माझ्या डोक्यात चाकूने वार केला. त्यावेळी मी माझा भाऊ श्रीनिवास याला आवाज देवून बोलावले असता विजू पठारे मला म्हणाला ‘तु बाहेर ये आज तुला सपंवुनच टाकतो’ अशी धमकी देवून मला घाणघाण शिवीगाळ केली.
त्यावेळी माझा भाऊ घरातुन बाहेर आला तेंव्हा विजु पठारे याचे घरातील लोक येवुन त्याला त्याचे घरी घेऊन गेले. त्यानंतर मी माझ्या भावासोबत रूग्णालयात उपचार घेऊन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हल्लेखोर विजू पठारे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यापासून आमच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगार विजू पठारे याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हल्ल्यातील जखमी वैष्णवकुमार याचा भाऊ श्रीनिवासकुमार परदेशी याने तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
पठारेची दहशत कायम
विजू पठारे हा सराईत गुन्हेगार आहे. तो टोळी करून परिसरात दहशत करत असतो. त्याच्याविरूध्द खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे, दरोडा, मारहाण, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे अशा विविध कलमानुसार गुन्हे दाखल आहेत. तोफखाना पोलीस ठाण्यात 15, कोतवाली पोलीस ठाण्यात दोन तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एक अशा 18 गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती. त्याने मध्यंतरी एका कार्यक्रमात चांगलाच राडा घातला होता. त्याची निलक्रांती चौक, बालिकाश्रम परिसरात चांगलीच दहशत आहे. पोलिसांनी त्याची दहशत मोडून काढावी अशी मागणी होत आहे.