कोल्हापूर । Kolhapur
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत काँग्रेस पक्षाने आघाडी घेत आपल्या उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली आहे. एकूण ८१ प्रभागांपैकी ४८ जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून, यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील चुरस वाढली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती आणि विधान परिषदेचे गटनेते तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्यातील इतर प्रमुख नेत्यांच्या सूचनेनुसार या ४८ नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
विशेष म्हणजे, ही यादी जाहीर करताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) यांच्या जागा वगळण्यात आल्या आहेत. ८१ जागांपैकी उर्वरित ३३ जागांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यापैकी कोणत्या जागा शिवसेनेला सोडल्या जातील आणि काँग्रेस स्वतःकडे आणखी किती जागा ठेवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सतेज पाटील यांची यंत्रणा या निवडणुकीसाठी पूर्णपणे सक्रिय झाली असून काँग्रेसने शहरात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या या पहिल्या यादीमध्ये जुन्या-जाणत्या चेहऱ्यांसह नव्या दमाच्या कार्यकर्त्यांनाही संधी देण्यात आली आहे. प्रभागनिहाय उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
प्रभाग क्र. २ मधून आरती दिपक शेळके, तर प्रभाग क्र. ३ मधून प्रकाश शंकरराव पाटील आणि किरण स्वप्निल तहसीलदार यांना उमेदवारी मिळाली आहे. प्रभाग क्र. ४ मध्ये स्वाती सचिन कांबळे, विशाल शिवाजी चव्हाण, दिपाली राजेश घाटगे, राजेश भरत लाटकर आणि अर्जुन आनंद माने यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
प्रभाग क्र. ६ मध्ये रजनिकांत जयसिंह सरनाईक, तनिष्का धनंजय सावंत आणि प्रतापसिंह दत्तात्रय जाधव यांना संधी दिली आहे. प्रभाग क्र. ७ मधून उमा शिवानंद बनछोडे, तर प्रभाग क्र. ८ मध्ये अक्षता अविनाश पाटील, ऋग्वेदा राहुल माने, प्रशांत उर्फ भैय्या महादेव खेडकर आणि इंद्रजित पंडितराव बोंद्रे निवडणूक लढवणार आहेत.
प्रभाग क्र. ९ साठी पल्लवी सोमनाथ बोळाईकर, विद्या सुनिल देसाई आणि राहुल शिवाजीराव माने यांची निवड झाली आहे. प्रभाग क्र. १० मधून दिपा दिलीपराव मगदूम, तर प्रभाग क्र. ११ मधून जयश्री सचिन चव्हाण आणि रियाज अहमद सुभेदार यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.
प्रभाग क्र. १२ मध्ये स्वालिया साहिल बागवान, अनुराधा अभिमन्यू मुळीक आणि ईश्वर शांतीलाल परमार यांना उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्र. १३ मध्ये पूजा भुपाल शेटे आणि प्रविण हरिदास सोनवणे, तर प्रभाग क्र. १४ मध्ये दिलशाद अब्दुलसत्तार मुल्ला आणि अमर प्रणव समर्थ यांची नावे आहेत.
प्रभाग क्र. १५ मध्ये विनायक विलासराव फाळके आणि आश्विनी अनिल कदम, तर प्रभाग क्र. १६ मध्ये संजय वसंतराव मोहिते आणि उमेश देवाप्पा पोवार निवडणूक लढवतील. प्रभाग क्र. १७ मध्ये उत्तम उर्फ भैय्या वसंतराव शेटके, अर्चना संदीप बिरांजे आणि शुभांगी शशिकांत पाटील यांना संधी मिळाली आहे.
प्रभाग क्र. १८ मधून प्रविण लक्ष्मणराव केसरकर, अरुणा विशाल गवळी, भुपाल महिपती शेटे आणि सर्जेराव शामराव साळुंखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शेवटी, प्रभाग क्र. १९ मध्ये दुर्वास परशुराम कदम आणि सुषमा संतोष जरग यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. उर्वरित जागांवर कोणाची वर्णी लागते, याची उत्सुकता आता कोल्हापूरकरांना लागली आहे.




