Friday, May 3, 2024
Homeनगरकोल्हार बुद्रुक व भगवतीपूर निवडणुकीचे ढोल वाजले

कोल्हार बुद्रुक व भगवतीपूर निवडणुकीचे ढोल वाजले

कोल्हार| Kolhar

प्रवरा परिसरात सातत्याने लक्षवेधी आणि राजकीयदृष्ट्या तितक्याच महत्त्वपूर्ण ठरणार्‍या कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर या दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकीचे ढोल वाजू लागले आहेत.

- Advertisement -

गेल्या दोन पंचवार्षिक विखे आणि खर्डे यांच्या सहमती एक्सप्रेसने गाव गाडा हाकला. मात्र यंदा दोन्ही गटाने आपापले स्वतंत्र पॅनल केले. त्यातून दोन्ही गावांमध्ये दुरंगी लढत होणार असे चित्र दिसते. अर्थात अर्ज माघारीच्या दिवशी या सर्व बाबींना यू – टर्न मिळून बिनविरोध निवडणूकसुद्धा नाकारता येत नाही. नव्हे येथून मागे असे घडलेही आहे.

करोनाच्या 8-9 महिन्यांच्या संक्रमणकाळात अनेकांनी बरेच काही भोगले. शेतकरी असो अथवा व्यापारी किंबहुना नोकरदार या सर्वांनाच आर्थिक झळा पोहोचल्या.एकेकाळचे एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले आ. राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी सरपंच अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे पाटील यांच्यात गेल्या 10 वर्षांपासून सहमतीने आणि सामंजस्याने गाव कारभार सुरू होता.

यंदाही निवडणूक सहमतीने होईल असे संकेत अनेकदा विखे पाटलांच्या भाषणांमधून मिळत होते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतरही येथे काही फारसा उत्साह दिसत नव्हता. तीन-चार दिवसांपूर्वी विखे गटाची आढावा बैठक कृषिभूषण राजेंद्र कुंकूलोळ यांच्या वस्तीवर झाली.

या बैठकीत निवडणूक लढविण्याची आग्रही भूमिका मांडण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपासून विखेंचे विरोधक असलेले भाजपचे कार्यकर्ते व माजी सरपंच डॉ. संजय खर्डे हे या निवडणुकीत विखे गटाकडून सक्रीय झाल्याने राजकीय भुवया उंचावल्या गेल्या.

कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूरमध्ये निवडणूक लढविण्याच्या घोषणा केल्या गेल्या. त्यावरून आमने-सामने सरळ लढत होईल असे दिसते. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असे एकंदरित चित्र राहील. भगवतीपूरमध्ये माजी जि. प. सदस्य डॉ. भास्करराव खर्डे यांनी भाजपाप्रणित जनसेवा मंडळ 100 टक्के निवडणूक लढविणार असून आमचा पूर्ण पॅनल तयार असल्याचे सांगितले. तर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल बांगरे यांनी महाविकास आघाडी ही जनसेवा मंडळाविरुद्ध लढणार असून आमच्या पक्षाकडून आम्हाला संपूर्ण ताकद मिळणार असल्याचे सांगितले.

यंदाची ग्रामपंचायत निवडणूक अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. एक म्हणजे सरपंचपदाचे आरक्षण हे ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर जाहीर होणार आहे. त्यामुळे सरपंच होण्याचे स्वप्न पाहणार्‍या अनेकांच्या मनसुब्यांना सध्यातरी आधांतरी स्थिती राहील. दुसरी बाब म्हणजे यंदा प्रथमच राज्यातील सर्वच पक्षांनी गावपातळीवरच्या या निवडणुकीत विशेष रस घेऊन ताकद देण्याचा निर्णय घेतला.

सहसा ग्रामपंचायत निवडणुका या गावपातळीवरील न समजणार्‍या राजकारणाने धुमसून निघतात. यंदा मात्र सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षीय पातळीवर यात लक्ष घातले. तिसरी बाब म्हणजे निवडणूक लढाविणार्‍यांमध्ये तरुणांचा उत्साह दांडगा दिसत आहे. त्यामुळे तरुणांना गावकीच्या राजकारणात सहभाग मिळेल असे दिसते. ग्रामपंचायत निवडणूक लढविणार्‍या इच्छुकांमध्ये तरुणांचा भरणा अधिक दिसतोय. अनेकांनी तर सोशल मीडियाद्वारे निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने प्रचारही सुरू केला आहे.

ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर होईल की सभांमधील राजकीय भाषणांतून खालच्या थराला जाऊन व्यक्तिगत चिखलफेक केली जाईल? हाही मोठा प्रश्न आहे. कारण येथून मागे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका असो अथवा अन्य निवडणुका या अत्यंत चुरशीच्या होऊन त्यात प्रचंड राजकीय आरोपांचा घमासान येथील नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवला आहे. त्या आठवणीही अद्याप ताज्या आहेत. या दोन्ही गावच्या निवडणुकांचे परिणाम इतर निवडणुकांमध्येही पहावयास मिळतात. नव्हे इतर गावांमध्येही त्याचा पाझर होत असतो हा देखील इतिहास आहे.

समझोता एक्सप्रेस अद्याप बिनसलेली नाही, असे सांगण्यात येत असले तरी निवडणूक होणार हे ग्राह्य धरून दोन्ही गावांत दोन्ही गटांनी पक्की तयारी सुरू केली आहे. काही जण अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. 4 जानेवारी रोजी अर्ज माघारीच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होईलच. तोपर्यंत जो-तो दंड थोपटून जास्तीत जास्त आवाज काढणार. कारण त्याशिवाय पुढची राजकीय गणिते व समीकरणे जुळत नाहीत. हा राजकारणाचा डाव असतो हे वेगळे सांगायला नको. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या गळ्यात हात घालून चाललेले राजकारण आता किती गळ्यापर्यंत येते आणि कोणते वळण घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या