Sunday, May 26, 2024
Homeनगरकोल्हार भगवतीपूरसह प्रवरा परिसरात पूर्ण बंद

कोल्हार भगवतीपूरसह प्रवरा परिसरात पूर्ण बंद

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कोल्हार- भगवतीपूरसह प्रवरा परिसरात बंद पाळण्यात आला. यावेळी कोल्हार येथील सभेत सरकारने मराठा समाजास सरसकट आरक्षण द्या अन्यथा सर्वांचेच आरक्षण थबवावे, अशी मागणी माजी सरपंच अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे यांनी केली.

- Advertisement -

मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सोमवारी गाव बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी सकाळपासूनच प्रवरा परिसरातील व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेऊन मराठा आंदोलनास पाठिंबा दर्शविला. कोल्हार येथे स्व. माधवराव खर्डे पाटील चौकात सभा झाली. या सभेत सर्वच समाजाच्या वक्त्यांनी मराठा समाजास आरक्षण मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सभेत राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले. मागील सर्व सरकार व आत्ताचे सरकार यांचेवर आरोप करून साखळी उपोषण व कँडल मार्च करण्याचे आवाहन करण्यात आले. सोबत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावामध्ये राजकीय नेत्यांना बंदी करावी, असा सूरही काहींनी काढला. मराठा आंदोलन कधीही हिंसक झाले नाही मात्र आता समाजाचा संयम सुटत असल्याचे दिसत आहे असे काहींनी म्हणणे मांडले. गत 70 वर्षांत कुठल्याही सरकारने आरक्षण दिले नाही ते आम्ही मिळवणारच असा सूर सभेत उमटला.

यावेळी अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे म्हणाले, गावामध्ये यापूर्वी शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण झाले आहे. राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती असेल तर आरक्षण सर्व शक्य आहे. स्वतःच्या हितासाठी राज्याची घटना बदलू शकता मग आमच्यासाठी का नाही? असा प्रश्न उपस्थित केला. राज्याच्या विधानसभेत 148 आमदार व महाराष्ट्रातील 65 टक्के खासदार मराठा आहेत. तरीसुद्धा मराठा समाजास आरक्षण दिले जात नाही.

मुळात स्वतःच्या फायद्याचा निर्णय असला की सर्व आमदार-खासदार एकत्र येतात, वेळ पडल्यास घटना बदलतात, मात्र मराठा आरक्षणासाठी का एकत्र येत नाहीत? असा प्रश्न अ‍ॅड. खर्डे यांनी उपस्थित केला. सर्व पक्षाचे पुढारी फक्त मतासाठी आपला उपयोग करतात आणि आपण फक्त त्यांच्या सतरंज्या उचलतोय हे थांबविणे आवश्यक आहे. साहेबांचा विचार तुम्ही करता मात्र साहेब तुमचा विचार करतात का, असा सवाल अ‍ॅड. खर्डे यांनी केला.

मराठा समाजास जाणून बुजून मागे ठेवण्यात आपल्याच मराठा पुढार्‍यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. आपला समाज मोठा व्हावा, असे एकही पुढार्‍यास वाटत नाही. आम्हाला कुठल्याही समाजाचे आरक्षण काढून नकोय तर हक्काचं हवं आहे. आज अनेक समाज बांधव दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत. त्यांनाही त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी आरक्षणाची गरज असून मराठा समाजास सरसकट आरक्षण द्यावं अन्यथा सर्वांचं थांबवावं, असा पुनरुच्चार अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे यांनी केला.

यावेळी देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, विखे कारखान्याचे संचालक स्वप्नील निबे उपस्थित होते तर ज्ञानेश्वर खर्डे, पंढरीनाथ खर्डे, अ‍ॅड. उदय खर्डे, श्रीकांत खर्डे, मयूर कडस्कर, असिर पठाण, श्रीकांत बेद्रे, बी. के. खर्डे, कॉ. सुरेश पानसरे, संजय शिंगवी, नितीन देवकर, जितेंद्र खर्डे, अरुण बोरुडे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी भगवतीमाता मंदिरात बैठक झाली.

भुजबळ साहेब तुमचं गुपित आम्हालाही सांगा की

काही वर्षांपूर्वी सध्याचे मंत्री छगन भुजबळ हे भाजी विक्रेते होते म्हणून समजले. आज त्यांच्या पन्नास पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती त्यांच्याकडे आहे. भाजी विकण्यात एवढा नफा कसा मिळतो, तुम्ही कुठली शेती करता हे गुपित एकदा मराठा समाजास सांगावं, असा उपरोधीक टोला यावेळी अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना लगावला.

अत्यंत क्लेशदायक – अ‍ॅड सुरेंद्र खर्डे

प्रवरा परिसरातील मराठा समाजात एकजूट नाही. आजच्या सभेसाठी मराठा बांधवांपेक्षा इतर समाजाची उपस्थिती लक्षणीय आहे. आपल्या मराठा आंदोलनास सर्व समाजाने पाठिंबा दिला. मात्र सभेसाठी कोल्हार-भगवतीपूर मधील पन्नास टक्केही मराठा समाज उपस्थित नाही ही बाब नक्कीच क्लेशदायक आहे, असे अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे यावेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या