Wednesday, October 30, 2024
Homeनगरकोल्हार खुर्द येथे वाळूतस्करीचा उच्छाद

कोल्हार खुर्द येथे वाळूतस्करीचा उच्छाद

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील प्रवरा नदीपात्रातून दिवसरात्र बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. येथील तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, स्थानिक पुढारी, ग्रामस्थ या सर्वांना याची पूर्ण कल्पना आहे. ग्रामस्थ या वाळूचोरीला आणि तस्करांना अक्षरशः वैतागले आहेत. कोल्हार खुर्दच्या तलाठ्यांना याबाबत विचारायला गेले तर ते म्हणतात. मी वाळूचोरी कशी थांबवू? मग प्रश्न हा उपस्थित होतो की, वाळूतस्करी महसूलच्या अधिकार्‍यांनी नाही रोखायची मग कोणी थांबवायची? म्हणजे तलाठ्यांना सर्व माहिती असताना जर वाळूवर अवैधरित्या डल्ला मारलो जातो तर मग याचा अर्थ काय समजायचा? ग्रामस्थ यामुळे संतापले असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

- Advertisement -

खुद्द महसूलमंत्र्यांच्या परिसरात आणि महसूल अधिकार्‍यांच्या मेहेरबानीने चाललेला हा दररोजचा प्रकार चीड निर्माण करणारा आहे. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाळूचा बेकायदेशीर उपसा होत असताना तलाठ्यापासून सर्व महसूल आणि पोलीस प्रशासन झोपेचे सोंग घेणार असेल तर जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. प्रवरा नदीला पाणी असतानाही क्रेन आणि तराफाच्या साह्याने दररोज वाळू ओरबाडली जात आहे. डंपर, टेम्पो, ट्रॅक्टरच्या साह्याने वाळू उपसा केला जातो. सरकारी अधिकार्‍यांशी लागेबांधे असल्याने त्यांच्या आशीर्वादाने चाललेली ही लुटमार उघड्या डोळ्यांनी पाहिली जात आहे.

शासनाच्या पाठबळावर चाललेला हा सावळागोंधळ कोल्हार खुर्द येथील नागरिकांना असह्य झाला आहे. दररोज चाललेल्या या वाळू उपश्याच्या व्हिडीओ क्लिप्स तलाठ्यांना दिल्या तरी त्यांच्याकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. वाळूचोरीला मी कसा रोखू? असा उलट सवाल तलाठी करतात म्हणजे नवलच म्हणावे लागेल. मग तालाठ्यांचे कामकाज कार्यालयात बसून निव्वळ दाखले देण्यापुरतेच आहे का? असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.

कोल्हार खुर्द येथून सुरू असलेल्या अनधिकृत वाळूतस्करीला प्रोत्साहन देऊन त्यातून आर्थिक लाभ पदरी पाडून घेणार्‍या सर्वांच्या विरोधात जनमत एकवटले आहे. तक्रारी करूनही कानावर हात ठेवणार्‍या तलाठी आणि महसूल अधिकारी यांच्याविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. लवकरच याचा उद्रेक होऊन मोठे आंदोलन केले जाणार असल्याचे ग्रामस्थ सांगतात. वाळूतस्करांचा उन्माद आणि महसूल अधिकार्‍यांचे यास असलेले अभय याविरोधात भडका उडणार असे दिसते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या