नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणी आज शनिवारी (दि.१८) सियालदह न्यायालयाने मुख्य आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवले. ९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी, उत्तर कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आरजी कार येथे एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा अनेक जखमांच्या खुणा असलेल्या मृतदेह आढळून आला होता. भारतीय न्याय संहीता कलम ६४ (बलात्कारासाठी शिक्षा), ६६ (मृत्यूचे कारण बनल्यासाठी शिक्षा) आणि १०३ (हत्येसाठी शिक्षा) नुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे.
शवविच्छेदन अहवालात आरोपीने आधी पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर तिची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होण्यासाठी आरोपीने तिचा दोनदा गळा दाबून जीव घेतला होता. सुरुवातीला आरजी कर मेडिकल कॉलेजने ही आत्महत्या असल्याचे सांगितले होते, पण नंतर हे प्रकरण समोर आल्यानंतर देशात खळबळ उडाली होती.
अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांच्या न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतर ५७ दिवसांनी हा निकाल देण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी ११ नोव्हेंबर रोजी सुरू झाली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घटनेचा तपास करणाऱ्या सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते.
आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येमुळे देशभरात संताप आणि निदर्शने झाली होती. संजय रॉयला दोषी ठरवताना तुला शिक्षा झालीच पाहिजे असे न्यायधीश म्हणाले. संजयला सोमवारी (दि.२०) रोजी शिक्षा सुनावली जाणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.
खोट्या खटल्यात अडकवले
एका खासगी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, आरोपी संजयने न्यायाधीशांना सांगितले की, “मला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. मी हे केलेले नाही. ज्यांनी हे केले त्यांना सोडले जात आहे. यात एक आयपीएस अधिकारी देखील सहभागी आहे.” ९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी, उत्तर कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आरजी कर येथे एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह अनेक जखमांच्या खुणा असलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दाखल केलेल्या ४५ पानी आरोपपत्रात सीबीआयने म्हटले आहे की पीडितेचे रक्त आरोपी संजय रॉयच्या जीन्स आणि शूजवर आढळले. तसेच घटनास्थळावर त्याचे केस आणि त्याच्या मोबाईलसोबत सिंक झालेला ब्लूटूथ इयरपीस देखील आढळून आला असल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या चौथ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला आरजी कर मेडिकल कॉलेजने ही आत्महत्या असल्याचे सांगितले होते, पण नंतर हे प्रकरण उलगडू लागले. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मुख्य आरोपी, नागरी स्वयंसेवक संजय राय याला अटक करण्यात आली होती.
दरम्यानच्या काळात, पीडितेला न्याय मिळावा आणि सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था असावी या मागणीसाठी कोलकाता येथील कनिष्ठ डॉक्टरांनी दीर्घकाळ आंदोलन केले. या काळात राज्यातील आरोग्य सेवाही दोन महिन्यांहून अधिक काळ ठप्प होत्या.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा