दिंडोरी | प्रतिनिधी
देशाला हुकूमशाहीकडे नेणार्या भाजप सरकारला सत्तेपासून रोखण्यासाठी फक्त दिल्लीत एकजुट होवून चालणार नाही तर गल्लीपासून एकजुट होणे आवश्यक असून त्याची सुरवात मोहाडीपासून सुरुवात करुन व आपआपसातले मतभेद बाजूला ठेवून महाविकास आघाडीच्या रुपाने एकत्र येत या सरकारला धडा शिकवण्याचा संकल्प महाविकास आघाडीच्या वतीने करुया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी केले. मोहाडी येथे महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी आव्हाड बोलत होते.
कोंडाजीमामा आव्हाडा म्हणाले की, देशातील महागाई, समाजात जातीयवाद, वाढती बेरोजगारी सारख्या समस्यांमुळे जनता त्रस्त झाली असून यातून सावरायचे असेल तर भाजपला सरकारला मुळापासून उखडून टाकणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन त्यांनी केले.
त्याचबरोबर विठ्ठलराव संधान, प्रकाश पिंगळ, पांडूरंग गणोरे, अॅड. विलास निरघुडे, बाळासाहेब जाधव, जयराम डोखळे आदींनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, माकप पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपआपसातील मतभेद बाजूला ठेवून हुकूमशाही चालू केलेल्या भाजपला सत्तेपासून रोखण्याचे आवाहन करत स्थानिकांना रोजगार, सक्तीची कर्जवसूली, शेतीमाला हमी भाव, तालुक्यातील रस्ते, आरोग्य, शिक्षण याबाबत तालुक्याची होत असलेली आदोगती त्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी समाजकल्याण सभापती पंडीतराव गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून साहेबराव पाटील, माकपचे जिल्हा सचिव आप्पासाहेब वटाणे, लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, माजी जिल्हा परिषद गटनेते प्रवीण जाधव, रा. कॉ. तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, शिवसेना तालुकाप्रमुख पांडूरंग गणोरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश पिंगळ, रायुकॉ जिल्हाध्यक्ष शामराव हिरे, बाळासाहेब जाधव, संतोष रेहरे, नरेश देशमुख, वाळू जगताप.
तसेच, अॅड. विलास निरघुडे, जयराम डोखळे, अनिल देशमुख, विठ्ठलराव संधान, नामदेव राऊत, एकनाथ खराटे, शैलाताई उफाडे, संगीता घिसाडे, बेबीबाई सोळसे, मोहाडी सरपंच आशा लहांगे, गुलाब जाधव, उत्तम जाधव आदी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कैलास कळमकर यांनी केले तर आभार भास्कर भगरे यांनी मानले. यावेळी महाविकास आघाडी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.