Saturday, November 16, 2024
HomeनगरKopargaon Assembly Election 2024 : डझनभर रिंगणात… लढत मात्र सरळ!

Kopargaon Assembly Election 2024 : डझनभर रिंगणात… लढत मात्र सरळ!

कोपरगाव विधानसभेसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून महायुतीकडून (राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून) विद्यमान आमदार आशुतोष काळे तर महाविकास आघाडीकडून (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) संदीप वर्षे निवडणूक रिंगणात आहेत. आघाडी धर्म पाळण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने युवा नेते विवेक कोल्हे यांना निवडणूक लढविण्यापासून थांबण्याची गळ घातली.

त्यांनी निवडणुकीपासून अंतर राखल्याने कोपरगाव विधानसभेची निवडणूक एकतर्फी असल्यासारखी वाटचाल करत होती. मात्र राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडीसाठी सभा घेवून लढतीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आशुतोष काळे यांच्यासाठी सभा घेऊन वातावरण निर्मिती केली. त्यामुळे सुरुवातीला निरस ठरत जाणाऱ्या निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात काही रंग भरले जात आहेत. डझनभर उमेदवार असूनही लढत मात्र सरळ असल्याचे चित्र मतदारसंघात आहे.

- Advertisement -

कोपरगाव विधानसभा निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रवादी, महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष अशोकराव काळे, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप गोरक्षनाथ वर्षे, बहुजन समाज पक्षाकडून महेबूब खान पठाण, बळीराजा पार्टीकडून शिवाजी कवडे, वंचित बहुजन आघाडीकडून शकील बाबुभाई चोपदार हे अधिकृत पक्षांकडून निवडणूक लढवत आहे तर किरण मधुकर चांदगुडे, खंडू गहिनीनाथ थोरात, चंद्रहंस अण्णासाहेब औताडे, दिलीप भाऊसाहेब गायकवाड, विजय सुधाकर जाधव, विश्वनाथ पांडुरंग वाघ व संजय भास्करराव काळे हे उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

कोपरगावमध्ये निवडणूक कोणतीही असो, प्रत्येकवेळी काळे विरूध्द कोल्हे असा संघर्ष ठरलेला असतो, कधी काळे तर कधी कोल्हे हेच सत्तेत असतात. काळे, कोल्हे म्हणजेच पक्ष अशी राजकीय स्थिती कोपरगावची असते. मात्र यावेळी राज्यात भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट अशी महायुती आहे.

या महायुतीतून कोपरगावची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना जाणार हे आधीपासूनच स्पष्ट होते. त्यामुळे भाजपपासून दुरावलेले कोल्हे काही काळ शरद पवार यांच्या संपर्कात होते. मात्र त्यांची मनधरणी करण्यात भाजप नेतृत्वाचे यश मिळवले. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीवर ऐनवेळी उमेदवार शोधण्याची वेळ आली. अखेर पक्षाने संदीप वर्षे यांना उमेदवारी दिली.

कोल्हे निवडणूक रिंगणात नसल्याने ही निवडणूक अगदीच निरस पद्धतीने पुढे सरकत होती. मात्र अखेरच्या टप्प्यात निवडणूक असल्यासारखी स्थिती मतदारसंघात जाणवत आहे. महायुतीत राष्ट्रवादीचे मित्रपक्ष असलेले शिवसेना शिंदे गट व भाजपातील कोल्हे गटाचे कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत काळे यांच्या प्रचारात सक्रीय झालेले दिसले. कोल्हे परिवाराने महायुतीच्या प्रचारात सक्रीय व्हावे, यासाठी भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी दिवाळी फराळानिमित्त कोपरगावात येवून कोल्हेंशी चर्चा केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हेंच्या निवासस्थानी जावून चर्चा केली. त्यानंतर कोल्हेंचे कार्यकर्ते आ. आशुतोष काळे यांच्या प्रचारात सक्रीय झाल्याचे पहावयास मिळाले. मात्र कोल्हे कुटुंबातील सदस्यांनी अद्याप अंतर राखले आहे. मात्र स्वतः आ. आशुतोष काळे यांनी कोल्हे परिवाराची भेट घेवून राजकीय ताकद वाढविण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

आता राजकारणात स्थिरावलेले आणि मुत्सद्दीपणाचे कौशल्य अंगी राखून असलेले आमदार आशुतोष काळे यांनी कार्यकर्त्यांना गाफील राहू नका, हा सल्ला आधीपासूनच दिला होता. आताही त्यांचे समर्थक सावध दिसतात. त्यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधून प्रचारात आघाडी घेतली आहे. मतदारसंघात केलेली ३ हजार कोटींची विकास कामे तसेच १३९ कोर्टीचा निधी खर्च करून ५ नंबर साठवण तलाव पूर्ण केला.

कोपरगावकरांना दिवसाआड पाणीपुरवठा करून शहराचा पाणीप्रश्न सोडविला. मतदार संघातील तरुणांसाठी ४२२ एकरावर एमआयडीसी उभारून तरुणांना रोजगार देणार आदी मुद्दे ते जनतेसमोर घेऊन जात आहेत. संदीप वर्षे यांच्या प्रचारात काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट सक्रीय झालेला दिसून येत आहे.

मतदारसंघात शेती पाण्याचा प्रश्न, उद्ध्वस्त झालेली कोपरगावची बाजारपेठ, गोदावरी कालव्यांची झालेली दुरवस्था, बेरोजगारी आदी मुद्दे त्याच्या प्रचारात केंद्रस्थानी आहेत. कोपरगावात काळे व कोल्हे या दोघांच्याही विरोधात एक गट नेहमी अग्रेसर असल्याचे दिसून येतो. त्यांची निवडणूक रणनिती काय असणार याकडे मतदारसंघाची नजर आहे. सर्वच उमेदवारांकडूनही जोरदार प्रचार होत आहे. आम्हीच तालुक्याचा विकास कसा करु शकतो, हे मतदारांवर बिंबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मतदार राजा काय निर्णय घेणार याचा ‘निकाल’ पुढील काही दिवसांतच समोर येईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या