राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार, जिल्ह्यातील प्रलंबित राहिलेल्या तीन नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी आज, शनिवारी (२० डिसेंबर) सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. यामध्ये कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी या नगरपालिकांसह नेवासा नगरपंचायतीचा समावेश आहे. तसेच, जिल्ह्यातील सात नगरपालिकांमधील रिक्त असलेल्या नगरसेवकांच्या १२ जागांसाठीही आजच मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसाठी सकाळच्या सत्रात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. सकाळी ७:३० ते ११:३० या पहिल्या चार तासांच्या कालावधीत एकूण १८.६२ टक्के मतदान झाले आहे.
मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे:
- एकूण मतदार: ६३,४४८ (पुरुष: ३१,१३२, महिला: ३२,३१२, इतर: ०४)
- झालेले मतदान (सकाळी ११:३० पर्यंत): ११,८१७
- पुरुष मतदार: ६,८३३
- महिला मतदार: ४,९८४
आज होत असलेल्या या मतदानानंतर सर्वांचे लक्ष उद्याच्या निकालाकडे लागले आहे. रविवारी (२१ डिसेंबर) या चारसह आधीच्या आठ नगरपालिकांचीही एकत्रित मतमोजणी होणार आहे. दुपारपर्यंत या सर्व १२ ठिकाणचे चित्र स्पष्ट होऊन विजयी उमेदवारांची घोषणा केली जाईल. प्रशासनाकडून मतदानासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, शांततेत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




