कोपरगाव (प्रतिनिधी)
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मोहिमेचा भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने कोपरगाव तालुक्यातील लौकी शिवारात मोठी कारवाई केली. या धाडसत्रात अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला असून, ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लौकी गावाजवळ असलेल्या ‘खटकडी ओढ्याच्या’ पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा सुरू होता. पढेगाव येथील रहिवासी रमेश जगन्नाथ मोरे (वय ४२) हा इसम या ठिकाणाहून ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या सहाय्याने चोरटी वाळू घेऊन वैजापूर रोडच्या दिशेने जाणार असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळाली होती.
माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने पुणतांबा चौफुली परिसरात अत्यंत गोपनीयरीत्या सापळा रचला. संशयित ट्रॅक्टर येताना दिसताच पोलिसांनी त्याला थांबवले. सुरुवातीला चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यामध्ये अवैध वाळूचा साठा आढळून आला. चालकाकडे वाळू उपसा किंवा वाहतुकीचा कोणताही शासकीय परवाना नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
या धडक कारवाईत पोलिसांनी ४ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर व ट्रॉली आणि सुमारे ५ हजार रुपये किमतीची अर्धा ब्रास वाळू, असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करून कोपरगाव तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. याप्रकरणी आरोपी रमेश मोरे याच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) २०२३ च्या कलम ३०५ (ई) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तस्करीमागे आणखी कोणाचे हात आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, प्रमोद जाधव, सतिष भवर, सुनील मालणकर आणि चालक महादेव भांड यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे तालुक्यातील वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.




