Sunday, November 24, 2024
HomeनगरKopargav Assembly Election Result : आशुतोष काळेंचा ऐतिहासिक विजय

Kopargav Assembly Election Result : आशुतोष काळेंचा ऐतिहासिक विजय

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव विधानसभा मतदार संघात माजी आ. स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिलेल्या शब्दाला जागूृन आ. आशुतोष काळे यांना सहाय्य केल्याचे मतमोजणीनंतर उघड झाले. त्यामुळे काळे-कोल्हे ही दोन्ही दिग्गज घराणी एकत्र आल्याने आ. आशुतोष काळे यांनी राज्यात विक्रमी 1 लाख 61 हजार 147 मते मिळवत 1 लाख 24 हजार 624 मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला. संदीप वर्पे यांच्यासाठी शरद पवार यांनी जाहीर सभा घेऊनही त्यांना केवळ 36 हजार 523 मते मिळाली. तिसर्‍या क्रमांकाची मते पिपाणी चिन्ह असलेल्या बळीराजा पार्टीचे उमेदवार शिवाजी कवडे यांना 3640 मते मिळाली. तर सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांना अवघी 1188 मते मिळाली. त्यांच्यापेक्षा जास्त नोटाला 1685 मते मिळाली.

- Advertisement -

20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर सर्वांना निकालाची उत्सुकता लागली होती. 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना 1 लाख 61 हजार 147 इतके मते घेत दणदणीत विजय मिळवला तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार संदीप वर्पे यांना 36 हजार 523 मतांवर समाधान मानावे लागले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात एकमेकांचे पारंपरिक विरोधक म्हणून काळे आणि कोल्हे राज्याला परिचित आहेत. विधानसभेसह सर्वच निवडणुकीमध्ये हे दोन्ही घराणे एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवतात आणि जिंकतातही हा इतिहास आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये कोल्हे परिवार पहिल्यांदाच निवडणुकीपासून अलिप्त राहिला. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे महायुतीचा धर्म पाळत शर्यतीत असलेले विवेक कोल्हे यांना या निवडणुकीत थांबावे लागले.

त्यामुळे सहाजिकच आशुतोष काळे यांना ही निवडणूक एकतर्फीच आहे अशी एकंदरित चर्चा होती. कोल्हे यांनी थांबण्याचा निर्णय घेतल्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर ऐनवेळी उमेदवार शोधण्याची वेळ आली. त्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते संदीप वर्पे यांना उमेदवारी दिली. अगदीच निरस असलेल्या या निवडणुकीत मोठ्या पवारांना कोपरगावात येऊन रंग भरावे लागले. शरद पवार यांची कोपरगावमध्ये सभा झाली. त्यानंतर निवडणुकीत चांगली चुरस निर्माण झाली. परंतु प्रत्यक्षात त्याचा परिणाम मतांवर झालेला नाही असे हे या निकालावरून स्पष्ट होत आहे. कोपरगावच्या इतिहासात निवडणूक प्रचारात पहिल्यांदाच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक न करता विकासाच्या मुद्यावर निवडणूक झाली. आ.आशुतोष काळे यांनी आपण पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा हिशोबच जनतेसमोर मांडला.

आशुतोष काळे यांचा विक्रमी मतांनी विजय झाल्यानंतर मतमोजणी केंद्राच्या बाहेर काळे समर्थक आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. गुलालाची उधळण, ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा केला. महिलांनी देखील गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरावर ठेका धरत आनंद साजरा केला. यावेळी अनेकांनी आशुतोष काळे यांना पुष्पहार घालत अभिनंदन केले.
शहरातील सेवानिकेतन स्कूल येथे मतमोजणी केंद्रात सकाळी 8 वाजता पोस्टल मतमोजणी सुरू झाली त्यानंतर साडेआठ वाजेच्या दरम्यान पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू झाली आणि दुपारी 2 वाजेपर्यंत संपूर्ण 20 फेर्‍या पूर्ण झाल्या. मतमोजणी केंद्रावर सीआरपीएफ गुजरात पोलीस आणि स्थानिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे अतिशय सुरळीत शांततेमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत उभ्या असलेल्या 12 पैकी 10 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या