कोळपेवाडी |प्रतिनिधी| Kolpewadi
कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीच्या घटनांनी कहर केला असतानाच आता थेट कोळगाव थडी येथे एका सिव्हील इंजिनिअरच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी चाळीस लाखांहून अधिक किमतीच्या मुद्देमालावर हात साफ केला आहे. धामणे परिवार लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधत शनिवारी (22 नोव्हेंबर) रात्री चोरट्यांनी हे धाडस दाखवले. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
कोळगाव थडी येथील रहिवासी असलेले प्रमोद एकनाथ धामणे (व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर) हे आपल्या दुमजली बंगल्यात राहतात. त्यांच्या भाच्याचे लग्न पारनेर तालुक्यातील आळकुटी येथे असल्याने संपूर्ण धामणे परिवार शुक्रवार 21 नोव्हेंबर रोजी पारनेर येथे गेला होता. घर बंद असल्याची ही संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील फर्निचर कपाटातील लॉकर फोडून आत ठेवलेले 10 तोळ्याच्या बांगड्या, साडेआठ तोळ्याचे गंठण, 5 तोळ्याची मोहनमाळ, अडीच तोळ्याच्या अंगठ्या, 5 ग्रॅम कानातील टापसे यासह जवळपास 27 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.
एवढ्यावरच न थांबता, लॉकरमध्ये ठेवलेले दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची रोख रक्कम आणि 250 ग्रॅम चांदीचे मौल्यवान दागिनेही चोरट्यांनी चोरून नेले. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून चोरीला गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत चाळीस लाखांच्या घरात आहे. विशेष म्हणजे शनिवारी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत धामणे यांच्या शेजारील वाकचौरे यांचा लग्नाचा मेहंदी कार्यक्रम सुरू होता. बंगला बंद असल्याची नेमकी माहिती ठेवून चोरीचा डाव साधणारी हे एखाद्या संघटित टोळीचे कृत्य असल्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत. सुरेगाव, अंबिकानगर, कोळपेवाडी यासारख्या ग्रामीण भागात बंद घरे आणि मंदिरांना चोरट्यांनी वारंवार लक्ष्य केले आहे. या सततच्या चोरीच्या घटनांचा तपास लावण्यात स्थानिक पोलीस यंत्रणा अकार्यक्षम ठरत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सातत्याने बंद असणारे कोळपेवाडी पोलीस आउटपोस्ट हे गुन्हेगारी वाढीस कारणीभूत ठरत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.
सोमवारी सकाळी धामणे यांच्या शेजारील पप्पू सोनवणे यांना बंगल्याचा दरवाजा उघडा दिसला, तेव्हा त्यांनी धामणे यांना फोन करून माहिती दिली. धामणे परिवार घरी परतल्यानंतर ही धाडसी चोरी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पी.आय. संदीप कोळी यांनी पोलीस कर्मचार्यांसह तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच अहिल्यानगर येथील गुन्हा अन्वेषण विभाग, फॉरेन्सिक इन्वेस्टीगेशन टीम आणि डॉग स्क्वॉड (श्वानपथक) ला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.




