अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी नगरपालिका आणि नेवासे नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तसेच सात नगरपालिकांमधील 12 नगरसेवकांसाठी हा निवडणुकीसाठी हा कार्यक्रम लागू राहणार आहे. या सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार चार नगराध्यक्ष आणि 100 नगरसेवकांचे भविष्य ठरणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्या दोन डिसेंबर रोजीच्या आदेशानुसार कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी नगरपालिका आणि नेवासे नगरपंचायत आणि सात नगरपालिकांमधील 12 प्रभागांच्या नगरसेवक पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नव्याने पालिका निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार दहा डिसेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. 11 डिसेंबरला चिन्ह वाटप होणार आहे. 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. 21 डिसेंबर मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
राज्यात सर्वत्र दोन डिसेंबर रोजी नगरपालिकांसाठी मतदान झाले. न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाने सर्वांचे निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. गुरूवारी जिल्ह्यातील पालिका व नगरपंचायतीचा निवडणूक कशा पद्धतीने होणार यासाठीचा सुधारित कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला. कोणत्याही प्रकारचे नामनिर्देशनपत्र नव्याने भरता येणार नाही. मात्र, ज्या उमेदवारांनी नामनिर्देशन यापूर्वी भरलेले आहेत. त्यांना 10 डिसेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेता येणार आहे. 11 डिसेंबर रोजी अत्यावश्यक असे चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्ष
कोपरगाव, पाथर्डी, देवळाली प्रवरा आणि नेवासे नगर पंचायतींमध्ये लोकांमधून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. अनेक ठिकाणी बहुरंगी निवडणूक होत आहे. स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने नगराध्यक्ष आणि नगरपालिकेतील सत्ता महत्वाची ठरणार आहे.
100 नगरसेवकांची होणार निवड
चार नगरपालिकांच्या सर्व जागा तर सात नगरपालिकांमधील काही प्रभागातील नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रमात समावेश आहे. कोपरगाव 30, पाथर्डी 20, देवळाली प्रवरा 21, नेवासे 17 अशा 88 जागेचा समावेश आहे. संगमनेर आणि शेवगाव प्रत्येकी 3, जामखेड 2 तर श्रीरामपूर, राहुरी, श्रीगोंदे, शिर्डी प्रत्येकी एक जागा अशा 12 नगरसेवकपदासाठी निवडणूक होणार आहे.




