कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
भ्रष्टाचाराने पोखरलेल्या महसूल विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. कोपरगाव तहसील कार्यालयातील महिला महसूल सहाय्यक अंजना पंडित पवार यांना 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीचा ताबा मिळवून देण्याच्या बदल्यात या महिलेने पैशांची मागणी केली होती. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या जमिनीचा वाटप तक्ता मंजूर करून त्याचा ताबा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि तहसीलदार यांच्याकडून आवश्यक आदेश मिळवून देण्यासाठी महसूल सहाय्यक अंजना पवार यांनी 7 हजार रुपयांची मागणी केली. आपली कायदेशीर कामे करण्यासाठीही सरकारी बाबू लाचेची मागणी करत असल्याने संतापलेल्या तक्रारदाराने थेट नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
तक्रार प्राप्त होताच, पोलीस निरीक्षक छाया देवरे आणि पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. सोमवारी दि. 2 फेबुवारी दुपारी कोपरगाव तहसील कार्यालय परिसरात पडताळणी केली असता, अंजना पवार यांनी पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर 7 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने झडप घालून त्यांना बेड्या ठोकल्या.
अंजना पवार यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. छाया देवरे, पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, अंमलदार गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, वैभव सुपेकर आणि चालक हारुण शेख आदींनी केली.





