सोनेवाडी । वार्ताहर
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी सावळीविहीर शिव रस्त्यावर गेल्या सहा महिन्यापासून बिबट्याचे वास्तव्य असून त्याची जबरदस्त दहशत झाली आहे. या बिबट्यामुळे रानावनात असलेल्या वस्त्यावर नागरिकांना दिवस अस्ताला जाण्याच्या आत जावे लागते.
शनिवारी रात्री साडेआठ वाजता सावळीविहिरी येथुन आपला हॉटेलचा व्यवसाय आटपून घरी येत असताना गोरक्षनाथ देविदास लिपणे यांच्या मोटरसायकलला हा बिबट्या आडवा झाला. प्रसंगावधान राखत लिपणे यांनी आपली मोटरसायकल तेथे सोडून माघारी पळ काढला. आरडा ओरडा व मोबाईल वरून फोन करत मदतीला आलेल्या नागरिकांनी त्यांची सुटका केली.
हे ही वाचा : मुळा धरणातुन आज पाण्याचा विसर्ग होणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सोनेवाडी पोहेगाव चांदेकसारे परिसरात या बिबट्याची प्रचंड दहशत असून बिबट्यांची संख्या चार ते पाच वर गेली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागणी केली आहे. मात्र वन विभागाकडून याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. वन विभाग एखाद्याचा जीव गेल्यावर या बिबट्यांचा बंदोबस्त करणार का सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सध्या परिसरात पावसाचे प्रमाण कमी असल्याने गोदावरी कालव्याच्या लिफ्ट मधून त्यांना ऊसाला पाणी द्यावे लागते मात्र बिबट्याच्या धास्तीने मजूर यायला धजावत नसल्याने आता शेतीचेही प्रचंड नुकसान होत आहे याला सर्वस्व जबाबदार वनविभागच आहे. जर गोरक्षनाथ लिपने यांच्या मदतीला दिनकर बोंडखळ, देविदास लीपने , गणेश बोंडखळ, रामदास बोंडखळ आले नसते तर त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता.
हे ही वाचा : मराठा आरक्षणावर शरद पवारांनी उचलले ठोस पाऊल; म्हणाले, आरक्षणाची ५० टक्क्यांची…
या बिबट्यांचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा. या परिसरात या बिबट्यांची संख्या किती आहे याची देखील नोंद आपल्या दप्तरी करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.