अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यात गाजलेल्या कोठेवाडी खुन प्रकरणातील शिक्षा भोगून बाहेर आलेल्या आरोपीने पुन्हा गुन्हेगारीकडे वळत इतर साथीदारांच्या मदतीने जबरी चोरी व घरफोडीचे तब्बल 12 गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करत आठ लाख दोन हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील अनेक प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लागला आहे.
15 जानेवारी रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास शेवगाव परिसरातील ढाकणे वस्ती येथे अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरात झोपलेल्या महिलांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटण्यात आली होती. याप्रकरणी विमल बबन ढाकणे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीष भोये, पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड, भाग्यश्री भिटे, वंदना मोडवे, चंद्रकांत कुसळकर, उत्तरेश्वर मोराळे यांचे विशेष पथक गठीत करण्यात आले.
गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शनिवारी (17 जानेवारी) बाराबाभळी ते चंदबीबी महाल परिसरात संशयास्पद हालचाली करणार्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपली नावे रोहित नादर चव्हाण (वय 26, रा. चिचोंडी पाटील, ता. अहिल्यानगर), बंटी टाबर चव्हाण (वय 27, रा. म्हरोळा, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), करण शिरसाठ भोसले (वय 22), अज्ञान उर्फ राजु उर्फ सक्या वकील्या भोसले (वय 50, दोघे रा. पिंपळवाडी, ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी सांगितली असून त्यांचा एक साथीदार विशाल टाबर चव्हाण (रा. म्हरोळा, ता. पैठण) हा पसार आहे.
संशयित आरोपींच्या कबुलीवरून व त्यांच्या सांगण्यावरून 54 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सोन्याचे लगड, लोखंडी कटावणी, पाना, दुचाकी असा एकूण आठ लाख दोन हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या चौघा आरोपींना मुद्देमालासह शेवगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास शेवगाव पोलीस करीत आहेत.
नगर-बीड जिल्ह्यात गुन्हेगारी
अटक करण्यात आलेल्या चौघांकडून पोलिसांनी सखोल चौकशी केली असता या टोळीने अहिल्यानगर व बीड जिल्ह्यात 12 जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. यामुळे शेवगाव, श्रीगोंदा, नेवासा, अहिल्यानगर तालुका, सोनई व बीड जिल्ह्यातील अमंळनेर पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे रोहित नादर चव्हाण व बंटी टाबर चव्हाण हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी दरोडा, चोरी, जबरी चोरी, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
शिक्षा भोगून टोळीत सक्रिय
कोठेवाडी खुन प्रकरणात शिक्षा भोगून बाहेर आलेला अज्ञान उर्फ राजु उर्फ सक्या वकील्या भोसले याने पुन्हा गुन्हेगारीकडे वळत इतर साथीदारांच्या मदतीने घरफोडी, जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे. भोसले हा गुन्हेगारी टोळीत सक्रिय झाला असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.




