मुंबई । Mumbai
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरानं एका कार्यक्रमात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर टीका करताना एक विडंबनात्मक गाणं सादर केलं. हे गाणं गाताना कुणालनं एकनाथ शिंदेंचा ‘गद्दार’ असा अप्रत्यक्ष उल्लेख केला.
व्हिडीओ व्हायरल होताच, शिवसेना (शिंदे गट) नेते आणि समर्थकांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. हे गाणं व्हायरल झाल्यानंतर, रविवारी (23 मार्च) शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार परिसरातील ‘द युनिकॉन्टिनेंटल’ हॉटेलची तोडफोड केली, जिथे स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराचा शो ज्या स्टुडिओमध्ये झाला, त्या स्टुडिओची तोडफोड केली. त्यानंतर वाद वाढला आणि याप्रकरणी कुणाल कामराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
आता याप्रकरणी कुणाल कामरानं एक पोस्ट करुन आपलं मत सविस्तर मांडलं आहे. कुणाल कामराने चार पानांचं एक ट्विट केलं आहे. त्यातून त्याने आपली भूमिका जाहीर केली आहे. या ट्विटमधून कामराने सत्ताधाऱ्यांना आणि शिंदे गटाला उपरोधिक चिमटे काढले आहे. कुणालने त्याच्या खास शैलीतून अत्यंत मार्मिक शब्दात या पत्रातून चिमटे काढले आहेत.
हॅबिटॅट हा एक मनोरंजनाचा मंच आहे. सर्व प्रकारच्या जागांसाठीचं ते एक व्यासपीठ आहे. हॅबिटॅट (किंवा इतर कोणतेही स्थळ) माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही. तसेच माझं बोलणं आणि कृती यावरही कोणतं नियंत्रण नाही. कोणताही राजकीय पक्षही नाही. एका विनोदी कलाकाराच्या शब्दावरून एखाद्या ठिकाणावर हल्ला करणे तितकेच मूर्खपणाचे आहे. तुम्हाला दिलेले बटर चिकन आवडले नाही म्हणून टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटवण्याचाच हा एक प्रकार आहे, असा चिमटा कुणालने काढला आहे.
बोलण्याचे आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य केवळ शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांची स्तुती करण्यासाठी नाही, आजची माध्यमं आपल्याला तसे भासवत असले तरी. सार्वजनिक जीवनातील बलाढ्य व्यक्तीवरील विनोद सहन करण्याची तुमची असमर्थता माझ्या हक्काचे स्वरूप बदलू शकत नाही. मला माहीत आहे त्यानुसार, आपल्या नेत्यांची आणि आपल्या राजकीय व्यवस्थेच्या तमाशाची थट्टा करणे कायद्याच्या विरोधात नाही. तरीही, माझ्याविरुद्ध केल्या गेलेल्या कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी मी पोलीस आणि न्यायालयांना सहकार्य करण्यास तयार आहे, असं त्याने म्हटलंय.
पण ज्यांनी एका विनोदाने दुखावल्यावर तोडफोड करणे योग्य ठरवले, त्यांच्यावर कायदा योग्य आणि समान रितीने लागू होईल का? आणि आज हॅबिटॅट येथे पूर्वसूचना न देता आलेल्या आणि हॅबिटेटवर हातोडा मारणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे का? असा सवाल त्याने केला आहे. पूर्व सूचना न देता हॅबिटॅटवर हातोडा टाकता? का तर मी तिथे कार्यक्रम करतो म्हणून. कदाचित माझ्या पुढील कार्यक्रमासाठी, मी एल्फिन्स्टन पूल किंवा मुंबईतील इतर कोणत्याही इमारतीची निवड करेन. मला वाटतं मग त्यालाही त्वरित पाडण्याची गरज आहे, असा चिमटा त्याने काढला आहे.
अनोळखी कॉल माझ्या व्हॉईसमेलवर जातात. तिथे तुम्हाला तेच गाणं ऐकायला मिळतं आणि ते तुम्हाला मुळीच आवडत नाही. हे तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल याची मला खात्री आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच या तमाशाचे प्रामाणिकपणे वृत्तांकन करणाऱ्या माध्यमांनी लक्षात ठेवावं की भारतात पत्रकार स्वातंत्र्य 159 व्या क्रमांकावर आहे, असं तो म्हणाला.
मी जे बोललो तेच अजित पवार (पहिले उपमुख्यमंत्री) यांनी एकनाथ शिंदे (दुसरे उपमुख्यमंत्री) यांच्याबद्दल बोलले होते. मला या जमावाची भीती वाटत नाही आणि मी हे शांत होण्याची वाट पाहत माझ्या पलंगाखाली लपणार नाही, असा टोलाही त्याने लगावला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर काल दिवसभरात सर्वांच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. पण खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. अखेर त्यांनी याप्रकरणी पहिलं भाष्य केलं आहे. कुणाल कामराने विडंबन गाण्यातून केलेल्या आरोपांविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “मी आरोपांवर उत्तर देत नाही. मी आरोपांवर कामाने उत्तर देतो. त्याचा फायदा आरोप करणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलं आणि काम करणाऱ्यांना लोकांनी सत्ता दिली.
“अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरअर्थ आणि गैरफायदा घेण्यात आला. मी विडंबन समजू शकतो. विडंबन अनेक कवी करायचे. पण हे व्यभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम आहे. माझ्यावरील आरोपांकडे मी दुर्लक्ष केलं. मी यासंदर्भात कोणालाही प्रतिक्रिया दिली नाही. पण कार्यकर्त्यांच्या भावना असतात. पण याच माणसाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्याबाबत काय म्हटलंय बघा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काय म्हटलंय, लाडकी बहीण अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविषयी काय म्हटलंय बघा, पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याबरोबर भांडला त्यामुळे त्याला दोन तीन एअरलाईन्समध्ये बाहेर केलंय. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीय. हे कोणाची सुपारी घेऊन आरोप केलेले आहेत, त्यामुळे मी काही रिॲक्ट झालो नाही”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.