Thursday, July 23, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडणार, कोणत्याही क्षणी घोषणा

Maharashtra ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडणार, कोणत्याही क्षणी घोषणा

मुंबई । Mumbai

राज्यात सध्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, आता ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याचे संकेत मिळाले आहेत. महानगरपालिकांचे निकाल लागताच राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

राज्यातील महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल स्पष्ट होणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत या निवडणुकांची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

निवडणूक आयोगातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा ७ जानेवारी रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वृत्तामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

राज्यात एकूण ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्या आहेत. मात्र, आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेमुळे सर्वच ठिकाणी निवडणुका होण्यात अडचणी येत आहेत. ज्या संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात आहे, तिथे तूर्तास निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. सूत्रांच्या मते, राज्यातील १७ जिल्हा परिषदा आणि ८८ पंचायत समित्यांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक होत असल्याने, त्यांना या निवडणूक प्रक्रियेतून वगळले जाऊ शकते. केवळ आरक्षणाचे निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांमध्येच ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.

सध्या सुरू असलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीमुळे संपूर्ण राज्याचे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कामात व्यस्त आहे. संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही सर्व यंत्रणा सध्या महापालिका निवडणुकीत गुंतलेली असल्याने, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम महापालिकांचे निकाल लागल्यानंतरच हाती घेतला जाणार आहे. आरक्षणाच्या अडथळ्यामुळे वेळापत्रक जाहीर करण्यास विलंब झाला असला, तरी आता निवडणूक आयोगाने निकषात बसणाऱ्या संस्थांसाठी कंबर कसली आहे. यामुळे जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ग्रामीण भागात राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : रक्तपेढीला मिळाले अखेर उद्घाटनाचे टॉनिक!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक भारतीय प्रतिभूती मुद्रणालय म्हणजेच इंडिया सियुरिटी प्रेसने आपल्या सीएसआर फंडातून दिलेल्या तीन कोटी बासष्ट लाख रुपये...