लॉकडाऊन हळूहळू संपुष्टात येत असून बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेत लोकही आता आपल्या कामाला बाहेर पडत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी चित्रीकरणास प्रारंभ केला असून प्रेक्षकांना त्यांच्या आवडीच्या व्यक्तिरेखा पुन्हा दिसू लागल्या आहेत.
त्यामुळे आपल्या परिचित व्यक्तिरेखांना पुन्हा टीव्हीच्या पडद्यावर पाहून प्रेक्षकही खुश झाले आहेत. ‘कुरबान हुआ’तील नील (करण जोटवाणी) आणि चाहत (प्रतिभा रांता) यांच्या नाट्यमय तरीही उत्कंठावर्धक कथेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.
‘कुरबान हुआ’तील चाहतच्या भूमिकेमुळे या क्षेत्रात पदार्पण केलेल्या प्रतिभा रांताने स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण केला असून करण जोटवाणीचे नावही आता घराघरात पोहोचले आहे. किंबहुना हा मेहनती कलाकार त्याच्या अन्य व्यावसायिक करारांमुळे गेले काही आठवडे दुपटीने मेहनत करीत आहे.
त्याच्या अफलातून अभिनयाची सार्वत्रिक प्रशंसा होत असली, तरी या अभिनेत्याला मात्र काही काळ थोडी उसंत हवी आहे, असे जाणवते. तो देन दोन मालिकांच्या चित्रीकरणाची तारेवरची कसरत करीत होता. या दोन्ही भूमिका गंभीर स्वभावाच्या असल्याने त्याला मानसिक त्रास खूप झाला आहे. त्यामुळे त्याला थोडा काळ विश्रांतीची गरज आहे. पण कामाचा ताण कमी करण्याचा करणचा मार्ग वेगळाच आहे.
तो म्हणतो, सध्या मी दोन मालिकांच्या चित्रीकरणासाठी धावपळ करीत आहे. त्यामुळे माझी खरंच दमछाक होते. मी माझ्याकडून अधिकाधिक चांगलं काम करण्याचा जीव तोडून प्रयत्न करीत असलो, तरी त्यामुळे माझी दमणूक होते आहे. पण मी ही दमणूक दूर करण्याचा वेगळाच मार्ग शोधून काढला आहे.
कुरबान हुआ मालिका उत्तमपणे साकार करण्यासाठी खूप माणसं मनापासून मेहनत करताना पाहून मलाही अधिक मेहनत करण्याची प्रेरणा मिळते. पण माझं मन खरं रमतं ते निसर्गाच्या सान्निध्यात. मला निसर्गात रंगून जायला आवडतं. त्यामुळे मला वेळ मिळाला की मी माझी बाइक बाहेर काढतो आणि सायकलिंगला जातो.
मी आजुबाजूला हिरवळ पाहिली की माझं मन ताजतवानं होतं. कधी कधी तर दोन प्रसंगांच्या चित्रीकरणाच्या मधल्या वेळेत मी सेटबाहेर येतो आणि शांतपणे बसतो. कारण आमच्या सेटच्या आजुबाजूला भरपूर हिरवाई आहे. मला निसर्गाच्या जवळ राहायला आवडतं आणि त्याचा परिणाम माझं मन शांत होण्यात होतो असे तो म्हणतो.
सर्व फोटो करण जोटवाणी यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरून साभार…