Thursday, September 19, 2024
Homeनगर‘बहिण माझी लाडकी’ च्या समितीवर भाजपचा ‘ताबा’

‘बहिण माझी लाडकी’ च्या समितीवर भाजपचा ‘ताबा’

महाविकास आघाडी हद्दपार || श्रीगोंदा, संगमनेर, पारनेरमध्ये अजित पवार गट पडला बाजूला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर शहरासह दक्षिणेतील तालुक्यात आयोजित बहिण माझी योजनेच्या महिला मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव गायब करणार्‍या राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला श्रीगोंदा, संगमनेर आणि पारनेर तालुक्यात भाजपने दणका दिला आहे. याठिकाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी गठीत तालुकास्तरीय समितीवर भाजप पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपचे परांपरिक वर्चस्व असणार्‍या तालुके, विधानसभा मतदाररसंघात भाजपच्या आमदारांना या समितीचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे. यामुळे सध्या गाजावाजा होत असलेल्या बहिण माझ्या योजनेवरून महायुतीमध्ये मोठा श्रेयवाद असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे आमदार असणार्‍या तालुक्यात देखील स्थानिक काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांना योजनेच्या तालुकास्तरीय समितीतून हद्दपार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहिण माझी लाडकी योजनेची घोषणा केली, त्या शिंदे शिवसेनेच्या एकाही पदाधिकार्‍यांना जिल्ह्यात बहिण माझ्या योजनेच्या तालुका समितीत स्थान मिळालेले नाही. यामुळे लाडकी बहिण योजनेवरून महायुतीमध्ये वर्चस्व वाद रंगत असल्याचे दिसत आहे. मात्र, सत्तेभागीदार असणार्‍या आणि भाजपसोबत जवळीक असणार्‍या तालुक्यात अथवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार अथवा त्यांच्या समर्थकांना योजनेच्या तालुका समिती स्थान देण्यात आले असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील ‘काहीं’मध्ये असंतोष धुमसत आहे. यात श्रीगोंदा, पारनेर आणि संगमनेर तालुक्यांचा समावेश आहे. यामुळे येथील पक्षाचे पदाधिकारी अजितदादांकडे याकडे तक्रार करणार ? आणि तक्रारी झाल्यास अजितदादा यात लक्ष घालून डावलले गेलेल्या समर्थकांना न्याय देणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

सध्या सर्वत्र बहिण माझ्या लाडक्या योजनेचा सर्वत्र गाजावाजा होत आहे. शहरासह ग्रामीण भागात महिला योजनेत अर्ज भरण्यात तर प्रशासन योजनेसाठी दाखल अर्जाची पडताळणी करण्यात व्यस्त दिसत आहे. जिल्ह्यात या योजनेत साडे सात लाखांच्या जवळपास अर्ज दाखल असून दाखल अर्जाची पडताळणी करण्यासाठी आधी तालुका पातळीवर आणि त्यानंतर जिल्हा पातळीवर समिती गठीत करण्यात आल्या आहेत. जिल्हा पातळीवर असणार्‍या समितीत 11 सदस्य असणार आहेत. या समितीचे अध्यक्ष संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे राहणार असून संबंधित जिल्ह्यातून मंत्री असल्यास ते समितीचे सहअध्यक्ष राहणार आहेत. उर्वरितमध्ये समितीच्या सदस्यांमध्ये अधिकार्‍यांचा समावेश राहणार आहे. जिल्हाधिकारी हे समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. तालुका पातळीवर असणार्‍या समितीचा अध्यक्ष हा अशासकीय व्यक्ती राहणार असून या समितीत दहा सदस्य राहणार आहेत. यात अध्यक्षांसह अन्य दोन अशासकीय म्हणजे एकूण तीन अशासकीय उर्वरित सात शासकीय अधिकारी हे सदस्य राहणार आहेत. संबंधित तालुक्याचे तहसीलदार हे समितीचे सदस्य सचिव राहणार आहेत.

तालुका पातळीवर समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडी जिल्हा पातळीवरून पालकमंत्री यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत. नगर जिल्ह्यात जवळपास निवड करण्यात आलेल्या सर्व तालुका समित्यांवर भाजपचे वर्चस्व दिसत आहे. तसेच दोन ठिकाणी भाजपशी (पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील) जवळीक असणार्‍या राष्ट्रवादीच्या आमदार अथवा समर्थकांना संधी देण्यात आली आहे. यामुळे श्रीगोंदा, पारनेर आणि संगमनेर तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थकांमध्ये डावलले गेल्याची भावना आहे. या भावनेचा भडका अजितदादांजवळ उडणार की गप्प राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

समितीचे निवडलेले अध्यक्ष
नगर शहर आ. संग्राम जगताप, शेवगाव- पाथर्डी आ. मोनिका राजळे, कर्जत-जामखेड आ. राम शिंदे, संगमनेर शरद गोर्डे, राहाता विद्या बनकर, राहुरी रविंद्र म्हसे, कोपरगाव चित्रा बर्डे (आ. काळे समर्थक), श्रीगोंदा मंगेश घोडके, पारनेर सुनील थोरात आणि श्रीरामपूर मंजूषा ढोकचौळे हे तालुका स्तरीय बहिण माझ्या लाडक्या योजनेचे अध्यक्ष आहेत.

नेवासा, अकोलेच्या निवडी बाकी
तालुकास्तरावर असणार्‍या बहिण माझ्या लाडक्या योजनेचे अध्यक्षपद हे अशासकीय व्यक्तीकडे सोपवण्यात आलेले आहेत. शासन निर्णयात तालुका पातळीवर समिती असणार असल्याचे नमुद असले तरी प्रत्यक्षात विधानसभा मतदारसंघनिहाय तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात 12 विधानसभा समित्या राहणार असून यातील दहाच्या निवडी झालेल्या असून नेवासा आणि अकोले तालुक्यातील समितीचे अध्यक्षांची निवड होणे बाकी असल्याचे जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या