मुंबई | Mumbai
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी वित्त विभागाने ४१० कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केली आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी पुन्हा वळवण्यात आला आहे. त्यामुळे आता साहजिकच सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी निधी कमी पडणार आहे. परिणामी आता सामाजिक न्याय विभागाला योजनांसाठी पैसे देताना हात आखडता घ्यावा लागणार आहे.
महिला-बालविकास विभागाने हा निधी अनुसूचित जातीच्या आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थी महिलासांठी वापरण्यात यावा, अशी सूचना केली आहे. सामाजिक न्याय विभागानंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा हफ्ता मिळणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जाणार आहे.
याबाबत माहिती देताना आदिती तटकरे म्हणाल्या, सणासुदीच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना तो हप्ता देण्यात यावा असा आमचा प्रयत्न असतो. विभाग म्हणून आम्ही याबाबतची प्रक्रिया मान्यतेसाठी दिली आहे. सणासुदीच्या कालावधीत निधी प्राप्त व्हावा ही आमची अपेक्षा असते. ज्यावेळी निधी मिळेल त्या क्षणी तो वितरित करण्यात येईल.’
तटकरे पुढे म्हणाल्या, ‘सध्याच्या परिस्थितीत जिथे नुकसानग्रस्त भाग आहे तिथे अधिकाधिक नुकसान भरपाई देणे याकडे शासनाचे प्राधान्य आहे. ज्या क्षणी लाडक्या बहिणीचा हप्ता किंवा त्याची मंजूरी ज्या क्षणाला आम्हाला येईल तशी ती लवकरात लवकर वितरित करू. सणासुदीच्या काळात लवकर मंजूरी आली तर चांगलेच आहे.’
महाराष्ट्र सरकारनं जुलै २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. तेव्हापासून म्हणजेच जुलै २०२४ ते ऑगस्ट २०२५ पर्यंत १४ हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींना मिळाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आले होते. आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने सप्टेंबरच्या महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याने येत्या काही दिवसात १५०० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतात.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




