अहमदनगर । प्रतिनिधी
नगर जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेत ६ लाख ९२ हजार महिला पात्र ठरल्या आहेत. मात्र, यातील १ लाख २१ हजार महिलांच्या बँक खात्यात अडचणी आल्या आहेत.
एकतर हे खाते आधार कार्डशी लिंक नाही, अथवा वेगवेगळ्या कारणामुळे बंद असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, १५ ऑगस्टला सकाळी सहा वाजल्यापासून अंगणवाडी सेविकांनी बँक खात्याबाबत अडचण आलेल्या खातेदारांना फोनाफोनी सुरू करत बँकेशी संपर्क करण्याचे आवाहन केले.
यामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सकाळपासून बँका, सेतू केंद्र हाऊसफुल्ल असल्याचे दिसून आले. नगर जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेचे काम जोरात सुरू आहे. या योजनेत ७ लाख ८ हजार महिलांचे अर्ज प्राप्त झाले होते. यातील ६ लाख ९२ हजार महिला योजनेसाठी पात्र करण्यात आल्या आहेत.
हे हि वाचा : ‘मविआ’त मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
त्यांची तालुकानिहाय यादी तयार केल्यानंतर आधार विभागाकडून पात्र महिलांची माहिती तपासली असता, १ लाख २१ हजार महिलांचे बँक खाते आधार लिंक अथवा वेगवेगळ्या कारणामुळे तात्पुरते नॉन अॅक्टिव्ह असल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ यांनी बुधवारी रात्री उशीरा आदेश काढत या बंद असणाऱ्या खात्यांबाबत संबंधित महिलांना कळवण्याचे आदेश काढले.
त्यानुसार बुधवारी रात्री उशीरा एसएमएस आणि गुरूवारी सकाळी सहापासून अंगणवाडी ताईने संबंधीत महिलांना फोन सुरू केले आणि तातडीने खाते असणाऱ्या बँकेशी संपर्क साधत आपले खाते आधार लिंक करण्याच्या सूचना दिल्या. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी संपर्क होऊ न शकणाऱ्या महिलांना दिवसभरात अनेकदा फोन करून याबाबत माहिती देण्यात आली.
त्यानुसार काही महिलांनी १५ ऑगस्टला सुरू असणाऱ्या बँकेच्या शाखेशी संपर्क केला. मात्र, खरी गर्दी शुक्रवारी सकाळी झाली. बँक आणि सेतू केंद्र सुरू होण्यापूर्वी त्याबाहेर महिलांनी रांगा लावल्या होत्या. साहेब माझे खाते कशामुळे बंद आहे, आधी माझे खाते आधार लिंक करा, अशी मागणी यावेळी महिला बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे करत होत्या.
हे हि वाचा : विदर्भात भाजपला मोठा धक्का! माजी खासदाराचा पक्षाला रामराम, काँग्रेसचा ‘हात’ हाती
सुरूवातीला बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गर्दी कशामुळे याचा अंदाज आला नाही. मात्र, सकाळी ११ वाजेपर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश मिळताच आधी लाडक्या बहिणींच्या मागणीनुसार कार्यवाही करण्यात येऊन त्यांचे खाते सुरू करणे, लिंकींग करण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले. जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग, महसूल विभागासह अन्य विभाग स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्टची सुट्टी न घेता या कामात व्यस्त असल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी सालिमठ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर प्रशासनाला सूचना देत होते.
हजारो महिलांच्या खात्यात पैसे
बहिण माझी लाडकी योजने अंतर्गत नगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील महिलांच्या खात्यावर शुक्रवारपासून पैसे जमा झालेले आहेत. हा आकडा ३० ते ५० हजारांपर्यंत असण्याची शक्यता आहे. पैसे मुंबईवरून वर्ग होत असल्याने येत्या दोन दिवसांत नगर जिल्ह्यातील किती महिलांच्या खात्यावर पैसा जमा झाला याची आकडेवारी उपलब्ध होणार आहे. तसेच ही प्रक्रिया निरंतर सुरू असल्याने बँक खात्याची लिंकींग पूर्ण होणाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.
हे हि वाचा : आर्मीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरूणांची फसवणूक
आदेशानंतरही बँका बंद
१५ ऑगस्टला जिल्ह्यातील सर्व बँकांनी आपल्या शाखा सुरू ठेवत लाडकी बहिण योजनेतील महिलांच्या खात्याचे आधार लिकींगसह अन्य कामे करण्याचे आदेश लीड बँकेला (अग्रणीय बँकेला) देण्यात आले होते. मात्र, लीड बँकेकडून याकडे दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी बँकांमध्ये एकदम गर्दी झाली.