Friday, January 23, 2026
HomeराजकीयLadki Bahin Yojana : काँग्रेसचा 'लाडकी बहीण' द्वेषाचा क्रूर चेहरा उघड; बावनकुळेंचा...

Ladki Bahin Yojana : काँग्रेसचा ‘लाडकी बहीण’ द्वेषाचा क्रूर चेहरा उघड; बावनकुळेंचा संताप, म्हणाले…

मुंबई । Mumbai

महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी ठरलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना पुन्हा एकदा राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, लाडक्या बहिणींचा रखडलेला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा एकत्रित हप्ता रोखण्यासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. काँग्रेसच्या या पावलावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत, काँग्रेसचा हा ‘माता-भगिनींबद्दलचा द्वेष’ असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

राज्यातील लाडक्या बहिणींचा डिसेंबर महिन्याचा हप्ता तांत्रिक कारणांमुळे अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर, म्हणजेच १४ किंवा १५ जानेवारी रोजी, डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याची तयारी केली होती. मात्र, हा हप्ता जमा होण्यापूर्वीच काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून या प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या काळात हे पैसे जमा करणे म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

YouTube video player

निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात काँग्रेसने म्हटले आहे की, “लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही, मात्र निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी १ कोटीहून अधिक महिला मतदारांच्या खात्यात ३००० रुपये जमा करणे हा मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न आहे. ही एक प्रकारे ‘सामूहिक सरकारी लाच’ असून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे.” त्यामुळे ही रक्कम निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महिलांना देण्यात यावी, असे निर्देश शासनाला द्यावेत, अशी विनंती काँग्रेसने आयोगाकडे केली आहे.

काँग्रेसच्या या भूमिकेवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडाडून टीका केली आहे. “महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसच्या मनात ठासून भरला आहे. आमच्या माता-भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेस नेत्यांना बघवत नाही,” असा आरोप त्यांनी केला. बावनकुळे पुढे म्हणाले की, जेव्हा ही योजना सुरू झाली, तेव्हापासूनच काँग्रेसने खोडा घालण्याचे प्रयत्न केले आहेत. सुरुवातीला हायकोर्टात याचिका दाखल करून योजना बंद करण्याचा प्रयत्न झाला आणि आता थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन बहिणींचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. संसाराला हातभार लावणारे पैसे रोखणे ही काँग्रेसची ‘जहरी विचारधारा’ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

काँग्रेसच्या या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने या पत्राला उत्तर देताना सांगितले की, “काँग्रेसने केलेल्या तक्रारीवर आम्ही गांभीर्याने विचार करू.” आयोगाच्या या उत्तरामुळे आता लाडक्या बहिणींच्या हप्त्याला तात्पुरता ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर आयोगाने काँग्रेसची मागणी मान्य केली, तर संक्रांतीच्या मुहूर्तावर मिळणारे पैसे लांबणीवर पडू शकतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार या योजनेद्वारे गरीब कुटुंबांना आधार देण्याचा प्रयत्न करत असताना, तांत्रिक आणि राजकीय कारणांमुळे हप्ता लांबणीवर पडत असल्याने महिला वर्गात चिंतेचे वातावरण आहे. नात्यात विष कालवणाऱ्या या राजकारणाला राज्याची जनता कधीही माफ करणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. आता निवडणूक आयोग यावर काय अंतिम निर्णय देतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

पासपोर्ट

Nashik News: परदेशगमन, शिक्षण, रोजगार, पर्यटनासाठी आठ वर्षात ‘एवढ्या’ नाशिककरांनी काढले...

0
नाशिक | प्रतिनिधीपरदेशगमन, शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी वाढलेल्या मागणीमुळे नाशिक शहरात पासपोर्टधारकांची (पारपत्र) संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या आठ वर्षांत (२०१८ ते २०२५) तब्बल...