मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. जवळपास दोन महिन्याची प्रतिक्षा आज संपली. सोमवारी रात्रीपासून महिलांच्या बँक खात्यात जानेवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून जानेवारीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटले.
या पोस्टमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नाव घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेची वाटचाल यापुढेही अशीच दमदारपणे सुरू राहील असं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जानेवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया २३ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.
महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.
दरम्यान, १८ फेब्रुवारीला सामाजिक न्याय विभागानं महिला व बाल विकास विभागाला ९८ कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली होती. ही रक्कम महिला व बाल विकास विभागाला मिळाल्यानंतर सोमवारपासून जानेवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झाली.





