Monday, August 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Budget Session: “शिक्षकांना कुत्रे मोजायची कामे?” विधान परिषदेत विक्रम काळे भडकले;...

Maharashtra Budget Session: “शिक्षकांना कुत्रे मोजायची कामे?” विधान परिषदेत विक्रम काळे भडकले; पंकज भोयर यांचे प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai
राज्यातील शिक्षकांना शासनाने भटक्या श्वानांची गणना करण्याचे काम दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेत बोलताना केला. शिक्षकांना शिकविण्याखेरीज अन्य कामे लावल्याने आधीच शिक्षक वर्गातून संताप व्यक्त करण्यात येतोय. त्यात आता शाळा परिसरात भटक्या श्वानांची गणना करण्याचे काम शिक्षकांना दिल्याचे आमदार काळे म्हणाले.

शिक्षकांना कुत्रे मोजायचे काम देऊन शिक्षकांचा मोठा अपमान
प्रश्नोत्तराच्या तासाला बोलताना विक्रम काळे म्हणाले की, आपल्या राज्यामध्ये सातत्याने शिक्षकांकडे असलेली अशैक्षणिक कामे काढावी आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम ठेवावं, यासाठी वेळोवेळी अनेक शिक्षक संघटना आणि अनेक शिक्षक लोकप्रतिनिधींनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे. मागे झालेल्या राज्यशिक्षक पुरस्कार वितरण समारंभात देखील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलेलं होतं की, यापुढे शिक्षकांना यापुढे शिकवण्याशिवाय इतर कोणतेही काम लावण्यात येणार नाही. मात्र आता कहरच झाला आहे. शिक्षकांना कुत्रे मोजायचं काम दिलेलं आहे. असे काम देऊन शासनाने एकप्रकारे शिक्षकांचा मोठा अपमान केला आहे.

- Advertisement -

अंदमान-निकोबार बेटावर मोठी दुर्घटना; उड्डाणाच्या काही वेळातच पवन हंस हेलिकॉप्टर समुद्रात कोसळलं

कोणतेही काम असो सरकारला शिक्षकच दिसतो
शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी राज्यामध्ये शिक्षकांना आपण आचार्य मानतो, एकीकडे आपण त्यांना मानाचा स्थान देतो आणि दुसरीकडे आपण त्यांना कुत्रा मोजायचे काम लावतो, त्याचबरोबर इतरही अशैक्षणिक कामे त्यांना लावली जातात, निवडणुका देखील त्यांना शिक्षक दिसतो, कोणतीही छोटी-मोठी निवडणूक आली तरी त्यांना शिक्षक दिसतो, मतदार यादी दुरुस्त करायचे असेल तरी शिक्षक दिसतो, स्वच्छता गृह मोजायचे असतील तरी शिक्षक दिसतात, सरकारकडे इतक्या यंत्रणा आहेत इतर कर्मचारी आहेत त्यांना काम नसते तरी त्यांना कामाला लावला जात नाही, अशी खंत काळेंनी सभागृहात मांडली.

एकीकडून आमच्याकडून गुणवत्तेची अपेक्षा केली जाते, परंतु दुसरीकडे…
विक्रम काळे म्हणाले की, एका शाळेमध्ये 60 शिक्षक आहेत. त्या शाळेतील 45 शिक्षक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कामासाठी घेतले होते. 15 शिक्षकांवर त्या शाळेतील दोन हजार मुलं कशी सांभाळायची? एका एका वर्गात 50 ते 60 मुलं असतात, अशावेळी शाळा कशी चालवायची? कलेक्टर यांना याबद्दल सांगितलं, तर ते तुमच्यावर गुन्हा नोंद करू सांगून भीती दाखवतात. एकीकडून आमच्याकडून गुणवत्तेची अपेक्षा केली जाते, परंतु दुसरीकडे अशैक्षणिक सगळं काम करून शिक्षक जास्त तास घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतो. विद्यार्थी आमचं दैवत आहे, त्यांच्यामुळे शाळा आहे आणि शाळेमुळे आम्ही आहोत. आम्ही हे सगळं कधी विसरत नाही, पण यानिमित्ताने माझी आपल्याला विनंती आहे की, मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी, आम्हाला बोलवावं आणि याचा सोक्षमोक्ष लावावा. मंत्र्यांनी फक्त उत्तर देऊन वेळ मारू नये, याचा सोक्षमोक्ष लावावा आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याशिवाय शिक्षकांना कोणतेही काम लावणार नाही, असं उत्तर मंत्री ठामपणे देतील काय? असा प्रश्न विक्रम काळे यांनी उपस्थित केला.

“फोन आला की त्वरित पोलिसांना कळवा” — डिजिटल अरेस्टवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडली महत्वाची भूमिका

राईचा पहाड कसा करायचा अशा प्रकारे ते अनुभवाचा फायदा घेत असतात – पंकज भोयर
यावर उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, सभापती महोदय विक्रम काळे हे सभागृहाचे जेष्ठ सदस्य आहेत, ते अनुभवी आहेत, या अनुभवाचा फायदा ते एखाद्या विषयाचा आपण म्हणतो तसे, राईचा पहाड कसा करायचा अशा प्रकारे ते अनुभवाचा फायदा घेत असतात. त्यांनी सांगितले की शिक्षकांना कुत्रे मोजण्याचे काम दिले आहे. माझा यावरती आक्षेप आहे. आम्ही देखील स्वीकारतो की शिक्षकांना शिकवण्या व्यतिरिक्त अनेक अशैक्षणिक कामे देण्यात आलेली आहेत. परंतु 28 -8- 2024 च्या शासन निर्णयानुसार आपण शैक्षणिक कामे कोणती आणि अशैक्षणिक कामे कोणती याचे आपण वर्गीकरण केलेले आहे. ज्या ज्या दुसऱ्या विभागाचे अशैक्षणिक कामे आहेत ते आपण सर्व विभागाला सूचना दिले आहेत की आमचे शिक्षक त्या ठिकाणी ही कामे करणार नाहीत. आपण याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. असे असताना देखील मी माहितीसाठी सांगतो बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत कलम 27 अन्वये दशवार्षिक जनगणना, आपत्ती निवरणाची कामे, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विधिमंडळ व संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकीची कामे शिक्षकांना करणे या ठिकाणी अनिवार्य आहे व त्यामध्ये नमूद केलेले आहे. असे असताना त्याच्या व्यतिरिक्त अजून बरीचशी कामे त्या ठिकाणी दिलेले आहेत. आपण त्या दोन्ही पोर्टलचा एकत्रिकरण केले आहे. आता जे वेगवेगळे दोन ॲप होते, त्यांचे एकत्रिकरण केले आहे.

शिक्षकांना कुत्रे मोजण्याचे काम कुठही दिलेले नाही – भोयर
पुढे पंकज भोयर उत्तर देताना म्हणाले की, विक्रम काळेजी आपण त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की, श्वान मोजण्याचे काम शिक्षकांना दिलेले आहे, श्वान मोजण्याचे काम त्या ठिकाणी दिलेले नाही, आपण पाहतो की अनेक ठिकाणी विपरीत घटना घडते सार्वजनिक ठिकाणी कुत्रे फिरतात, त्यामुळे अनेक घटना घडतात, एक व्यक्ती त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि त्या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेले आहेत, माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या ज्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत सुयोग्य उपाययोजना करणे, त्या परिस्थितीमध्ये जर खाद्यपदार्थ पडले त्याची विल्हेवाट लावणे या अनुषंगाने आपण आपल्या शैक्षणिक प्रिमायसेस मध्ये त्याला व्यवस्थित कुंपण असले पाहिजे, त्या ठिकाणी खाद्यपदार्थ पडलेले नसले पाहिजेत, याची काळजी घेण्याचे काम त्या ठिकाणी शिक्षकांनी दिलेले आहे, कुत्र मोजण्याचे काम त्या ठिकाणी कुठले दिलेले नाही, त्यामुळे हा आपला प्रश्न मी दूर करतो.

दुसऱ्या अजून काही इतर अशैक्षणिक कामे त्यांच्याकडे देण्यात आलेले आहे. यासाठी शासन गंभीर आहे. शासनाने येणाऱ्या काळामध्ये किमान एक शनिवार त्यांना फक्त ही कामे करण्यात करता द्यावा का? म्हणजे आठवड्यातला एक दिवस फक्त ते आणि बाकीचे सर्व दिवस शिक्षणाचे काम त्या ठिकाणी करतील किंवा गावागावांमध्ये आपले जे सेतू आहेत, सुविधा केंद्र आहेत, त्या सुविधा केंद्राच्या माध्यमातून हे रिपोर्टिंग त्यांना करता येईल का? असा देखील विचार त्या ठिकाणी चालू आहे. याचा नेमका किती आर्थिक भर शासनावरती पडू शकतो हे कॅल्क्युलेशन करून तुमचं मार्गदर्शन तुमचं सहकार्य त्याच्यामध्ये घेण्यात येईल आणि त्यानंतर तो निर्णय अंतिम घेण्यात येईल अशी माहिती देखील राज्यमंत्री पंकज भोयार यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पवारांकडून जिल्हा बँकेबाबत चाचपणी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर जिल्हा बँकेच्या होवू घातलेल्या निवडणुकीबाबत रविवारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय स्थिती जाणून घेत काय भूमिका घेता...