Friday, September 20, 2024
Homeनगरदलाल, एजंटांवर कारवाईसह लूट करणार्‍या सेतूची मान्यता रद्द करा

दलाल, एजंटांवर कारवाईसह लूट करणार्‍या सेतूची मान्यता रद्द करा

लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

राज्य सरकारने घोषणा केलेल्या बहिण माझी लाडकी योजना नगर जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात यावी. या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर आहे. योजना जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी दलाल, एजंट सक्रिय झालेेले आहेत. या दलाल, एजंट यांचा बंदोबस्त करण्यासोबतच जादा पैसे आकारणार्‍या सेतू केंद्राची तात्काळ मान्यता रद्द करावी, असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

नगरला ऑनलाईन आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांना दिलेल्या आदेशात ना. विखे म्हणाले, जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात बहिण माझी लाडकी योजना प्रभावीपणे राबवावी. योजना राबवत असतांना सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. योजनेसाठी दलाल, एजंट सक्रीय झाले आहेत. याबाबत लवकरच गाव पातळीपर्यंत फलक लावून प्रबोधन करण्यात येणार आहे.

अनेक ठिकाणी सेतू केंद्रचालक हे योजनेचा अर्ज भरण्यासाठी 100 ते 200 रुपये घेत असल्याच्या तक्रारी आहेत. तक्रारी येणार्‍या सेतू चालकांचा परवाना तात्काळ रद्द करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. योजनेत महिला स्वयं घोषणापत्र देत असल्याने त्या आधारावर त्यांना लाभ मिळणार असल्याने यात दलाल, एजंट यांचा संबंध राहणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शुक्रवारपर्यंत 17 हजार अर्ज प्राप्त
बहीण माझी लाडकी योजनेचे जिल्ह्यात सुमारे 4 लाख 50 संभाव्य लाभार्थी असू शकतील. शुक्रवारपर्यंत 17 हजार 118 लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. जिल्ह्यात राबवल्या जाणार्‍या विविध योजना, मतदार यादीतील 21 ते 65 वयोगटातील महिला, यानुसार ही संभाव्य लाभार्थ्यांची संख्या असू शकते, असा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत ही योजना राबवली जात असली तरी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकार्‍याचे नगरमधील पद रिक्त असल्याने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) मनोज ससे यांची या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने ‘नारी शक्ती दूत’ नावाचे मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. जिल्ह्यातील 6 हजार 650 अंगणवाडी व इतर कर्मचार्‍यांनी हे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाउनलोड केले आहे. या अ‍ॅपवर 2 हजार 860 नाव नोंदणी झाली आहे. याशिवाय प्रत्यक्ष स्वरूपात 14 हजार 260 अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्य सरकारने योजनेचे अर्ज दाखल करण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख दिली असली तरी 15 जुलैपर्यंत जिल्ह्यात संभाव्य लाभार्थींची नावे संकलित केली जातील,असेही जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

अधिकार्‍यांनी स्वतंत्र पाहणी करावी
जिल्ह्यात सुरू असणार्‍या विकास कामाची प्रत्येक विभागाच्या अधिकार्‍यांनी तालुका पातळीवर आणि काम पातळीवर जावून पाहणी करावी. यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी स्वतंत्र पातळीवर तालुकानिकाय दौरा करावा, अशी सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी केली. अधिकार्‍यांच्या तालुका भेटीच्या विषयावर आ. तांबे आक्रमक झालेले दिसले. यावेळी आ. बबनराव पाचपुते यांनी जलजीवनची कामे निकृष्ठ सुरू असून त्यांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करत पावसात दक्षिणेत अनेक ठिकाणी बंधारे फुटले असून त्यांना निधी मिळावा, अशी मागणी केली.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याबाबत आ. कानडे आग्रही
श्रीरामपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विषयावर बैठकीत आ. लहू कानडे आग्रही होते. त्यावर पालकमंत्री विखे पाटील यांनी श्रीरामपूर येथील शिवाजी महाराज पुतळ्यासंदर्भात सविस्तर अहवाल घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले. तसेच श्रीरामपूर तालुक्यातील नाविण्यपूर्ण योजनेतील महिलांना टेलेरिंग प्रशिक्षण योजनेत तांत्रिक अडचण आल्याने या योजनेला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली. आ. लहामटे यांनी अकोले तालुक्याला नाविण्यपूर्ण योजनेत तिनवर्षात निधी न मिळाल्याचे सांगत यंदा निधीची मागणी केली. तसेच अकोल्याच्या दुर्गमभागात एसटी सेवा सुरू राहावी, अशी मागणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या