पाटणा | Patna
बिहारच्या निवडणुकांचा निकाल लागून २४ तासही उलटत नाही तोच बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या दारुण पराभवानंतर यादव कुटुंबात दुफळी निर्माण झाली आहे. लालू यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी ट्विट करत कुटुंबाशी संबंध तोडण्याचा निर्णय जाहीर केला. एका पोस्टमध्ये त्यांनी राज्यसभा खासदार संजय यादव यांचा उल्लेख करत म्हटले आहे की, “मी सर्व दोष स्वतःवर घेत आहे.” असे म्हणत कुटूंबाशी नाते तोडत असल्याची घोषणाच करुन टाकली आहे.
रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर मी माझ्या कुटुंबीयांशीही सर्व संबंध तोडत आहे. संजय यादव आणि रमीज यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. मी जो काही निर्णय घेतला आहे त्यासाठी पूर्णपणे मी जबाबदार आहे.” आचार्य यांनी सुरुवातीला फक्त राजकारण सोडण्याबद्दल आणि कुटुंबाशी संबंध तोडण्याबद्दल लिहिले होते.
लालू प्रसाद यादवांना किडनी दान केली
रोहिणी आचार्य यांनी ५ डिसेंबर २०२२ रोजी त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांना किडनी दान केली होती. सिंगापूरमधील माउंट एलिझाबेथ रुग्णालयात प्रत्यारोपण यशस्वी झाले, ज्यामुळे देशभर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. रोहिणी त्यांच्या कुटुंबासह सिंगापूरमध्ये राहतात.
कोण आहे रोहिणी आचार्य
रोहिणी आचार्य लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाच्या माजी सदस्य आहेत. त्या व्यवसायाने डॉक्टर आहे. काही वर्षांपूर्वी वडील लालू प्रसाद यादव यांना किडनी दान केल्यामुळे चर्चेत आल्या होत्या. रोहिणी आचार्य यांनी गेल्या वर्षी सारण येथून लोकसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा पराभव झाला होता. त्यांना भाजपाचे राजीव प्रताप रुडी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.




