शिरसगाव/खैरी निमगाव |वार्ताहर| Shirasgav
आमच्या जमिनी आम्हाला दिल्यानंतर शेती महामंडळाच्या शिल्लक जमिनी निविदा पध्दतीने देण्यात याव्यात, अशी मागणी अकारी पडीत शेतकर्यांची असताना तालुक्यातील एकवाडी, पाचवाडी हद्दीत मुठेवाडगाव रोडलगत शेती महामंडळाने त्यांच्या हद्दीतील वेड्या बाभळी, काटे, झाडे काढण्याचे काम निविदाद्वारे एका ठेकेदाराला दिले. जेसीबी मशिनच्या साह्याने काट्या, झाडे काढण्याचे काम सुरु झाले. परंतू त्यास परिसरातील अकारी पडीत शेतकर्यांनी विरोध दर्शविला. हरेगाव-ब्राम्हणगाव फाटा जवळील शेती महामंडळ कार्यालयाजवळ 200 शेतकर्यांनी उग्र आंदोलन पुकारले. शेवटी पोलीस प्रशासनाने शेतकर्यांना स्थानबध्द करण्याची कारवाई केली.
अकारी पडीत शेतकर्यांना त्यांच्या जमिनी परत केल्याशिवाय शेती महामंडळाच्या जमिनी निविदा पद्धतीने कोणाला देऊ नये, अथवा सार्वजनिक कामासाठी सुद्धा देऊ नये, अशी मागणी अकारी पडीत शेतकर्यांनी याअगोदर केली आहे. त्यासंदर्भात उच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यासाठी अनेकवेळा अकारी पडीत शेतकर्यांनी आंदोलने देखील केलेली आहे. त्यामुळे शेती महामंडळाच्या जमिनीबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. परंतू काल दि.12 जून रोजी बी सी नाला परिसरात शेती महामंडळाने त्यांच्या हद्दीतील वेड्या बाभळी, काटे, झाडे काढण्याचे काम निविदाद्वारे एका ठेकेदाराला दिले. जेसीबी मशिनच्या साह्याने काट्या, झाडे काढण्याचे काम सुरु झाले. त्यास परिसरातील अकारी पडीत शेतकर्यांनी विरोध दर्शविला.
प्रसंगी प्रथम आमचा प्रश्न मार्गी लावा, उच्च न्यायालयात शेतकर्यांच्या बाजूने निर्णय झालेला असताना व मंत्रिमंडळात धोरणात्मक निर्णय झाला असताना देखील शेती महामंडळ पोलीस प्रशासनाची मदत घेऊन आमच्या प्रश्नात अडथळा निर्माण करत आहे, 10 महिने झाले तरी अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा भावना शेतकर्यांनी व्यक्त केल्या. तर सुमारे 200 शेतकर्यांनी हरेगाव-ब्राम्हणगाव फाटा शेती महामंडळ कार्यालयाजवळ आंदोलन पुकारले. त्यामुळे शेतकर्यांना स्थानबध्द करण्याची कारवाई करण्यात येवून शहर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. त्यावेळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे आदी उपस्थित होते.
हे आंदोलन शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. या प्रश्नावर योग्य निर्णय न झाल्यास शेतकरी आपल्या जनावरांसह आज दि. 13 जूनपासून आंदोलन हाती घेणार आहे. हा संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळी प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी अकारी पडीत शेतकर्यांनी केली आहे.





