Wednesday, November 6, 2024
Homeमुख्य बातम्यास्मार्ट प्रकल्पांतर्गत लासलगाव बाजार समिती राज्यात प्रथम

स्मार्ट प्रकल्पांतर्गत लासलगाव बाजार समिती राज्यात प्रथम

लासलगाव | प्रतिनिधी

जागतिक बँक अर्थसहाय्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीची राज्यात दुसर्‍यांदा प्रथम क्रमांकाने निवड झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी दिली.

- Advertisement -

राज्यात जागतिक बँक अर्थसहाय्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविण्यात येत असुन या प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रकाशित करणे हा एक प्रमुख घटक आहे. त्याअंतर्गत बाजार समितीच्या वार्षिक कामगिरीच्या आधारावर मुल्यांकन करून राज्यभरातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रकाशित करणे अपेक्षित होते.

त्यानुसार पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि पणन) यांचेमार्फत बाजार समित्यांमधील पायाभुत व इतर सेवा सुविधा निकषांसाठी ८० गुण, आर्थिक निकषांसाठी ३५ गुण, वैधानिक कामकाज निकषांसाठी ५५ गुण व इतर निकषांसाठी ३० गुण असे एकुण २०० गुण निश्चित करण्यात आले होते.

त्यानुसार प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने ठरवुन दिलेल्या गुणांकनानुसार लासलगाव बाजार समितीच्या सन २०२२-२३ या वर्षाच्या वार्षिक कामगिरीची पहाणी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, निफाड यांचे कार्यालयाने करून वस्तुनिष्ठ गुणांकनाचा प्रस्ताव पणन संचालनालयातील स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्षास सादर केला होता.

त्याप्रमाणे प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने सदर प्रस्तावाची छाननी करून सन २०२२-२३ या वर्षाच्या वार्षिक क्रमवारीत लासलगाव बाजार समितीस एकुण २०० गुणांपैकी १६९ गुण देऊन राज्यस्तरीय क्रमवारीत प्रथम क्रमांक दिलेला आहे.

नुकतेच अमृत महोत्सवी वर्ष पार केलेल्या लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीने गेल्या ७६ वर्षांमध्ये शेतकरी बांधव व इतर बाजार घटकांसाठी उभारणी केलेल्या विविध पायाभुत सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या विविध योजना, उपक्रम यातील कामगिरी उल्लेखनीय असल्याने स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे प्रमुख तथा राज्याचे पणन संचालक डॉ.केदारी जाधव यांचे अध्यक्षतेखालील समितीने राज्यस्तरीय क्रमवारीत लासलगाव बाजार समितीस प्रथम क्रमांकाचे मानांकन निश्चित केले असल्याचे दि.२३ ऑक्टोबर रोजीचे पत्रान्वये बाजार समितीस कळविले आहे.

लासलगाव बाजार समितीने शेतमाल विक्रीची व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने व्यापारी वर्गाशी समन्वय साधुन अमावस्या, शनिवार व इतर शासकीय सुट्टयांच्या दिवशी लिलावाचे कामकाज सुरू केल्यामुळे वर्षभरात लिलावाचे कामकाज वाढले. तसेच उन्हाळ्यात व पावसाळ्यात शेतीमाल लिलावासाठी मुख्य व उपबाजार आवारांवर भव्य लिलाव शेडची उभारणी करून ऐन करोना कालावधीत शेतकर्‍यांना पिशवी मार्केटच्या माध्यमातुन कांदा विक्रीची सुविधा निर्माण करून दिली.

खानगांव नजिक येथे फळे व भाजीपाला लिलाव सुरू करून शेतकर्‍यांना पर्याय उपलब्ध करून दिला आहे, असे क्षिरसागर यांनी सांगितले. बाजार समिती शेतकरी बांधव व इतर मार्केट घटकांच्या हितासाठी व त्यांच्या शेतीमालाला अधिकाधिक भाव मिळण्याच्या दृष्टीकोनातुन स्पर्धाक्षम बाजार व्यवस्था निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सोई व सुविधांची उभारणी तसेच शेतकरी लाभाच्या आणखी योजना/उपक्रम कायदेशीर तरतुदीनुसार राबविणेसाठी नक्कीच अपेक्षांची पुर्तता करेल, अशी आशा व्यक्त करून बाजार समितीच्या उत्तरोत्तर विकासासाठी डॉ. जाधव यांनी बाजार समितीतील सर्व घटकांना शुभेच्छा दिल्या.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या