परदेशात राहणार्या भारतीयांनाही या कालावधीत प्रवेश नाही
नवी दिल्ली – करोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताने पुढचे काही दिवस स्वत:ला जगापासून वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 15 एप्रिलपर्यंत सगळे व्हिसा रद्द केले आहे. परदेशातून येणार्या व्यक्तींपासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र राजदूत, संयुक्त राष्ट्र, महत्त्वाच्या प्रकल्पांवरील अधिकार्यांना यातून वगळण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जगभरातून भारतात येणार्या पर्यटकांचे व्हिसा आजपासून (13 मार्च) पासून रद्द होतील. परदेशात राहणार्या भारतीयांनाही या कालावधीत प्रवेश दिला जाणार नाही.
जगभरात कोरोनाचा झालेला फैलाव आणि दुबई, अमेरिकेसह काही देशांतून परतलेल्या भारतीयांमध्ये दिसून आलेली कोरोनाची लक्षणे या पृष्ठभूमीवर हा निर्णय घेतला गेला. परदेशात राहणार्या भारतीयांना (ओएसआय कार्डधारक) देशात व्हिसामुक्त प्रवास करता येतो. मात्र कोरोनाच्या पृष्ठभूमीवर त्यांनाही 15 एप्रिलपर्यंत भारतात येता येणार नाही.
15 फेब्रुवारी 2020 नंतर भारतात दाखल झालेल्या चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीच्या नागरिकांना वेगळे ठेवण्यात येणार आहे. या देशांमधून आलेल्या भारतीय नागरिकांना देखील किमान 15 दिवस वेगळे ठेवले जाईल. भारतात येण्याच्या विचारात असलेल्या परदेशी नागरिकांना जवळच्या भारतीय दुतावासाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गरज नसताना परदेशात जाऊ नका, शक्य असल्यास प्रवास टाळा, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे.