Monday, May 27, 2024
Homeनाशिकमोबाईल चोर निघाला खुनाच्या गुन्ह्यातील संशयित

मोबाईल चोर निघाला खुनाच्या गुन्ह्यातील संशयित

नवीन नाशिक । प्रतिनिधी

घरफोडीचा प्रयत्न करीत असलेल्या एका आरोपीला अश्विन नगर परिसरात छत्रपती सेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याकडे चौकशी केली असता सदर आरोपी हा अंबड परिसरात एका महिलेचा खून करून पळून आला असल्याचे चौकशीत त्याने कबुली दिली.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की छत्रपती सेनेचे चेतन शेलार, नीलेश शेलार, तुषार गवळी हे रात्रीच्या वेळी सिम्बॉयसिस शाळा परिसरातून जात असताना एका महिलेचा आरडाओरड करण्याचा आवाज आल्याने त्यांनी सदर ठिकाणी जाऊन बघितले असता सदर महिलेच्या घरात दोघेजण घरफोडीच्या प्रयत्नात लपून बसले होते. त्यातील एक जण त्याठिकाणी असलेल्या अंधाराचा फायदा घेत पळून गेला तर दुसरा आरोपी आकाश डोळसे हा त्यांच्या तावडीत सापडला. दरम्यान शेलार यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत कळविले. यावेळी अंबड ठाण्याचे कर्मचारी प्रशांत नागरे, देवेंद्र बर्डे, मुरली जाधव, नितीन फुलमाळी, मारुती गायकवाड यांनी आरोपीला ताब्यात घेतले.

यावेळी पोलिसांनी सदर आरोपी आकाश डोळसे (19 ) याची चौकशी केली असता प्रथम दर्शनी त्याने मोबाईल चोरी केले असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यास घटनास्थळी नेले असता अंबड येथील रमाबाई आंबेडकर नगर येथे राहणारी रेखा अवचर (26) या महिलेचा त्याने खून केल्याचे तेथे निष्पन्न झालेे व त्याने त्याची कबुली देखील दिली. यावरून रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

दरम्यान, अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकार हा प्रेम प्रकरणातून घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पुढील तपास उपायुक्त विजय खरात, सहाय्यक उपायुक्त अशोक नखाते, समीर शेख, अंबड पोलीस ठाण्याचे व.पो.नि. कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या