नाशिक । प्रतिनिधी
‘तालाभिषेक 2019’ या कार्यक्रमात तीन तालात उठाण, पेशकार, कायदा, रेला यासह अन्य प्रकारांच्या तबला वादनाच्या सादरीकरणाने तबला रसिकांसह उपस्थित श्रोत्यांवर तालाभिषेकाने मोहिनी घातली.
गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी पवार तबला अकादमीच्या सुवर्ण महोत्सवी आणि एसडब्ल्यूएस फायनान्शिअल सोल्यूशन प्रा. लि. रजत महोत्सवी वर्षानिमित्त ‘तालाभिषेक 2019’ चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अद्वय पवार आणि शौनक राजहंस यांनी प्रथम तबला वादनातील नानाविध प्रकार तीन तालात सादर करून रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. या तबला वादनाने श्रोते काहीकाळ मंत्रमुग्ध होऊन गेले होते.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन तालयोगी पं. सुरेश तळवलकर, पं. शशिकांत (नाना) मुळ्ये, पं. ओंकार गुलवडी यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर तालयोगी सुरेश तळवलकर यांची संकल्पना असलेल्या ‘ताल कीर्तन’ या कार्यक्रमात भारतीय तसेच पाश्चात्य तालवाद्यांचा अनोखा संगम सादर करण्यात आला. यात पं. सुरेश तळवलकर आणि सावनी तळवलकर-गाडगीळ(तबला) अभिषेक भुरूक (ड्रम), इशान परांजपे (कॅजोन), ऋतुराज हिंगे (कलाबश) अभिषेक शिनकर (संवादिनी) विनय रामदासन (गायन) यांनी ताल रूपकमध्ये पेशकार, कायदा, रेला, चलन इ. चे सादरीकरण केले.
यानंतर आडाचौतालात विविध बंदिशी, तिहाई, चक्रकार, गती, तुकडे यांचे सादरीकरण करण्यात आले. एसडब्ल्यूएस फायनान्शिअल सोल्यूशन्सतर्फे निवृती जाधव, रवींद्र जाधव, संपत गुरूकुले, स्वप्निल एकांडे, डॉ. रूपाली कुलकर्णी यांचा तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तालाभिषेक 2019 चे स्वागत डॉ. पंडित अविराज तायडे यांनी केले; तर प्रास्ताविक रघुवीर अधिकारी यांनी तर सूत्रसंचालन व आभार सुनेत्रा महाजन यांनी केले.
दिग्गज तबला गुरू एकाच मंचावर
सभागृहातील कार्यक्रमादरम्यान, एक अनोखा योग तमाम रसिक, श्रोत्यांना पाहायला मिळाला. तालयोगी पद्मश्री सुरेश दादा तळवलकर, पं. शशिकांत मुळ्ये, पं. ओंकार गुलवडी, पं. विजय हिंगणे व पं. कमलाकर वारे हे सगळे दिग्गज तबला गुरू एकाच मंचावर उपस्थित असल्याने सर्वांनाच आनंदाचा धक्का बसला. या सर्व गुरूजनांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. तसेच त्यांंचा पवार तबला अकादमीचे ज्येष्ठ शिष्य गिरीश पांडे, नितीन वारे आणि नितीन पवार यांच्याहस्ते कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.